ठाणे : उर्वरीत बिलाच्या रक्कमेच्या 2.5 टक्के प्रमाणे 27 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडअंती 20 हजार रुपयेही स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता आणि शिपायास ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी, 11 नोव्हेंबर 2024 रोजी सापळा कारवाई दरम्यान शिपाई, वर्ग ४ यांना तक्रारदारांकडून 20 हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले. आरोपी विकास जाधव असून त्याचे पद कार्यकारी अभियंता, वर्ग – 1 आणि चेतन देसले यांचे पद शिपाई आणि वर्ग 4 आहे. दोघांची नेमणूक ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात आहे. संबंधित तक्रार 7 नोव्हेंबर रोजी मिळाली आणि लाच मागणी पडताळणी 8 नोव्हेंबर रोजी करण्यात आली.
लोकसेवक विकास जाधव, कार्यकारी अभियंता यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही लोकसेवकांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. आरोपीने तक्रारदार यांच्या प्रलंबित बिलातील रक्कमेच्या 2.5 टक्के प्रमाणे 45 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी त्यांच्याविरूध्द कारवाई करण्यासाठी ठाणे एसीबी येथे तक्रार दिली. या अनुषंगाने केलेल्या कारवाई दरम्यान संबंधित लोकसेवक यांनी बिलातील शासकीय शुल्क कपात केली आणि उर्वरीत बिलाच्या रक्कमेच्या 2.5 टक्केप्रमाणे 27 हजार रुपये लाचेची मागणी केली व तडजोडअंती 20 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले.
त्यानुसार 11 नोव्हेंबर 2024 रोजी सापळा कारवाई दरम्यान, चेतन देसले यांना तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपये रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले आहे. लोकसेवक विकास जाधव, कार्यकारी अभियंता यांनादेखील ताब्यात घेण्यात आले आणि दोन्ही लोकसेवकांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
पोलिस अधीक्षक सुनील लोखंडे, अतिरिक्त अधिक्षक गजानन राठोड आणि संजय गोविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजश्री शिंदे, महिला पोलीस हवालदार रूपाली देसाई, पोलीस नाईक बाळू कडव, पोलीस नाईक विनोद जाधव यांनी ही कामगिरी केली.