निवडणूक कधीही घ्या; उद्धव ठाकरेंना घरी कायमचे बसावे लागणार

किरिट सोमय्या यांनी केले भाकित

ठाणे : निवडणुका कधीही घ्या, महाविकास आघाडीचे पानीपत होईलच, पण उद्धव ठाकरे यांना आता कायमचे घरी बसावे लागणार आहे, असे भाकित भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे.

ठाण्यातील पाचपाखाडी येथे वंदे मातरम संघाच्या वतीने आयोजित केलेल्या माघी गणेशोत्सवात उपस्थित राहुन सोमय्या यांनी गणरायाचे दर्शन घेतले. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह माजी मंत्री अनिल परब आणि हसन मुश्रीफ यांचीही पोलखोल केली. याप्रसंगी भाजप प्रदेश सचिव संदीप लेले, ओबीसी सेलचे सचिन केदारी, सागर भदे उपस्थित होते.

श्री. सोमय्या पुढे म्हणाले, पक्ष चिन्हाच्या लढाईत उद्धव ठाकरे यांना कायमचा मातोश्रीवर आराम करावा लागेल. निवडणुकीच्या पॅनेल पद्धतीवरून आरोप करणाऱ्या आव्हाडांचा समाचार घेताना त्यांनी, त्रिसदस्यीय घ्या किवा चार सदस्यीय पॅनेल पद्धतीने कुठल्याही निवडणुका घ्या, मविआचे पानीपत होणार असून उद्धव ठाकरे यांना कायमचे घरी बसावे लागणार आहे, असे भाकित सोमय्या यांनी केले.

माजी मंत्री अनिल परब यांना आणखी एक दणका मिळाला आहे. परब यांनी वांद्रे पूर्व येथे म्हाडाची जमीन बळकावून तिथे एक हजार चौरस फुटाचे अनधिकृत कार्यालय बांधले होते. लोकायुक्तांनी ते तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ते तोडू दिले नव्हते. मात्र आज ते अनधिकृत कार्यालय उध्वस्त करण्यात आले असून मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता हे उध्वस्त झालेले कार्यालय बघायला जाणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.