ओव्हरसाईज होर्डिंग्ज उतरवा; ठामपाने बजावल्या नोटीसा

एमएसआरडीसी, रेल्वे आणि एस.टी महामंडळालाही दिले पत्र

ठाणे: मुंबईमधील होर्डिंगच्या दुर्घटनेनंतर अखेर शहरात ओव्हरसाईज असलेल्या जवळपास ३२ होर्डिंगवर अखेर ठाणे महापालिकेने कारवाई केली आहे. हे होर्डिंग्ज तत्काळ उतरवा, अशा आशयाच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर शहरातील होर्डिंग मालकांना पालिका प्रशासनाच्या वतीने तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यापैकी काही होर्डिंग हे दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त आकाराचे असल्याने अशा बेकायदा होर्डिंगवर कारवाई करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली होती. त्यानंतर काही दिवसांमध्ये शहरातील विविध भागात महापालिकेने ३२ होर्डिंगवर कारवाई केली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

होर्डिंग पडून निष्पाप लोकांचे बळी गेलेल्या घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर ठाण्यातील सर्व होर्डिंग मालकांना होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश महापालिकेने दिले होते. ज्यांचे ऑडिट झाले असले तरी अशा होर्डिंग मालकांना पुन्हा ऑडिट करण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या होत्या. शहरातील होर्डिंगचे कालबद्ध पध्दतीने स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे यासाठी कालमर्यादा निश्चित करावी व अस्तित्वातील सर्व होर्डिंग टॉवरचे स्ट्रक्चरल ऑडिट संबंधितांकडून करुन घ्यावेत. स्ट्रक्चर ऑडिटनंतर होर्डिंग सुरक्षित नसल्याचे आढळल्यास ते होर्डिंग तत्काळ काढण्याची जबाबदारी ही संबंधित कंपनीची असेल, त्यानंतरही जर एखादी दुर्घटना घडून एखाद्याचा मृत्यू झाल्यास संबंधित कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असे निर्देश तत्कालीन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी जून २०२३ मध्ये दिले होते. मात्र घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर पालिकेने पुन्हा एकदा होर्डिंगची तपासणी करून ओव्हरसाईज होर्डिंगवर कारवाई केली आहे.

घाटकोपरची दुर्घटना घडल्यानंतर ज्या २९४ होर्डिंग धारकांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या, त्यापैकी जवळपास २०० होर्डिंग मालकांनी पालिका प्रशासनाकडे स्ट्रक्चरल ऑडिट सादर केले आहे. मात्र ओव्हरसाईज होर्डिंग शहरात तसेच असल्याने अखेर अशा ३२ होर्डिंगवर ठाणे महापालिकेने कारवाई केली आहे. दुसरीकडे अशा ओव्हरसाईज होर्डिंगवर कारवाई करण्यासाठी ठाणे महापालिकेने एमएसआरडीसी, रेल्वे आणि एस.टी महामंडळाला देखील पत्र दिले आहे. एमएसआरडीसीच्या हद्दीत १८, एस.टी महामंडळाच्या हद्दीत २ तर रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत १ होर्डिंग असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.