पावसाळ्यात घरच्याघरी घ्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरू झाला की अनेक प्रकारचे संसर्गजन्य आजार पसरतात. मुख्यतः त्वचेसंबंधी आजार फंगल इन्फेक्शन, एक्झिमा, सोरायसिस, त्वचेवर पुरळ, खाज येणे, रॅशेस येणे हे विकार दिसून येतात. चेहऱ्याच्या त्वचेची अतिरिक्त काळजी घेणे या ऋतुत आवश्यक असते तर जाणून घेऊया पावसाळ्यात त्वचेसंबंधी काळजी घेण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स :

* पावसाळ्यात तुम्ही काय खाता हे खूप महत्वाचे आहे. या दिवसांमध्ये तेलकट, चमचमीत पदार्थ मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. त्याचाच नकळत परिणाम तुमच्या त्वचेवर होत असतो. यासाठी योग्य व संतुलित आहार घेण्यावर भर द्या.

* पावसाळ्यात हवेत आर्द्रता मोठ्या प्रमाणात असते. सततच्या पावसाच्या पाण्याचा संपर्क त्वचेशी येतो त्याकारणाने त्वचा देखील ओलसर राहते, जंतुसंसर्ग वाढतो, खाज येते. अशा वेळी त्वचा जास्तीत जात कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करा.

* आंघोळीच्या पाण्यात कडुलिंब, तुळशीची पाने तसेच तुरटी याचा वापर करावा.

* आयुर्वेदानुसार या काळात शरीरात वात वाढतो त्यामुळे या वाताचे नियमन करण्यासाठी दररोज अंघोळीपूर्वी तिळाच्या तेलाचे अभ्यंग करा.

* पावसाळ्यात दिवसातून ३-४ वेळा सोप फ्री क्लिंझर किंवा फेस वॉशने चेहरा स्वच्छ धुवा व कोरडा ठेवा.

* सतत चेहऱ्याला हात लावणे टाळा.

-पावसाळ्यात तेलकट त्वचेसाठी मुख्यत्वे काळजी घ्या. बंद रोमछिद्रांना उघडण्यासाठी आणि मृत त्वचा (dead skin) काढून टाकण्यासाठी आठवड्यातून १-२ वेळा exfolliate (सौम्य scrub) करावे. याकरता
* साखर + मध यांचा स्क्रब करा.
* टोमॅटो ज्यूस + साखर स्क्रब करा.
* राईस वॉटर किंवा तांदळाच्या पिठाने स्क्रब करा.
स्क्रब केल्यानंतर हलकी वाफ घ्यावी.

* त्वचा जास्त तेलकट वाटल्यास चणा डाळ +मसूर डाळ+हळद यांचा पाण्यातून लेप करावा.
कोरड्या त्वचेसाठी याच लेपात साय घालावी व सर्वसामान्य त्वचेसाठी हाच लेप आठवड्यातून एकदा दुधातून करावा.

* या ऋतुत जंतुसंसर्ग टाळण्यासाठी व त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी २ चमचे कोरफड + १ चमचा हळद हा लेप करावा.

* गुलाबपाणी हे एक उत्तम नैसर्गिक टोनर आहे. दररोज रात्री झोपताना याचा वापर केल्याने तुमच्या त्वचेचा PH संतुलित राहतो व त्वचा चमकदार दिसते.

* पावसाळा असला तरी दररोज नित्यनियमाने सनस्क्रीनचा वापर करा. कमीतकमी SPF ३० असलेले सनस्क्रीन वापरा.

* पावसाळ्यात कमीत कमी मेकअपचा वापर करा. मेकअप काढतेवेळी बदाम तेल किंवा खोबरेल तेल यांचा वापर करा.

* आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने विविध मुखलेप, नस्य (नाकात औषध टाकणे) आयुर्वेदिक तेल, औषधी तूप यांचा तसेच गरजेनुसार पंचकर्मीचा वापर करून आपण त्वचेची अतिरिक्त काळजी घेऊ शकतो.

पावसाळ्यात तेल नियंत्रण, हायड्रेशन, आर्द्रता आणि प्रदूषकांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी लक्ष केंद्रित करा.

डॉ. अश्विनी पाटील

अथर्व आयुर्वेद क्लिनिक पंचकर्म सेंटर व एम. डी (आयुर्वेद)