पावसाळ्यात घ्या लहान मुलांच्या आरोग्याची काळजी !

पाऊस सुरु झाला की आजारांचे प्रमाण वाढते व लहान मुले सारखेच आजारी पडतात. पावसाळ्यामध्ये कधी पाऊस, तर कधी ऊन सतत होणारे हवामानातले बदल, दमटपणा यामुळे जिवाणू व विषाणूंची वाढ झपाट्याने होते व आजार पसरतात. आजारांमध्ये मुख्यतः संसर्गजन्य आजार, दूषित पाण्यातून पसरणारे आजार, डास चावल्याने होणाऱ्या आजारांचा समावेश होतो. 
 
१) दमटपणा वाढल्याने झपाट्याने जिवाणू-विषाणूंची वाढ होत असते. त्यामुळे मुलांना सतत सर्दी, खोकला, न्यूमोनिआ सारखे आजार होऊ शकतात. 
यासाठी प्रतिबंधक उपाय – 
* पावसात वारंवार भिजू नये. 
* थंड पदार्थ, फ्रिजमधील पदार्थ मुलांना देणे टाळा. 
* आजारी व्यक्तींपासून शक्यतो मुलांना दूर ठेवणे. 
* मुले आजारी असताना त्यांना आरामाची गरज असते. त्यांना घरी आराम करू द्या. लवकर बरे होतील. 
* पावसाळ्या अगोदर स्वाईन फ्ल्यूचे लसीकरण करावे. न्यूमोनिआचे लसीकरण पूर्ण झाले आहे का हे लसीकरण कार्डवर तपासून बघा. नसल्यास डॉक्टरांकडून लसीकरण करून घ्या. 
 
२) दूषित पाण्यातून टायफाईड, कावीळ अ प्रकार, डायरिया, कॉलरासारखे आजार होतात. यासाठी प्रतिबंध म्हणजे उकळून गार केलेले पाणी पिणे उत्तम. ते शक्य नसल्यास घरातील ऍक्वागार्ड फिल्टरचे पाणी प्यावे. त्याची सर्व्हिसिंग पावसाळ्याआधीच करावी. 
* मुलांची नख कापलेली असावीत. हात दिवसभरात ४ ते ५ वेळा धुवावे. जेवणाआधी, बाहेरून आल्यावर, शी-सु नंतर हात स्वच्छ धुण्याची मुलांना सवय लावावी. 
* मुलांची खेळणी स्वच्छ धुवावी. घरातील लादी जंतुनाशक टाकून स्वच्छ पुसावी. 
* बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. घरातही खाद्यपदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावे जेणेकरून माशा बसणार नाहीत. 
 
३) पाणी साठल्यामुळे डेंगू, मलेरिया, चिकनगुनियासारखे आजार वाढतात. ते टाळण्यासाठी – 
* गरजेपेक्षा जास्त पाण्याचा साठा करू नका. रोजच्या कचऱ्याची रोज विल्हेवाट लावा. 
* कुंड्यांमध्ये अतिरिक्त पाणी साठू देऊ नका. सोसायटीचे आवार स्वच्छ ठेवा. पावसाचे पाणी व्यवस्थित ओसरेल याची सोय करून घ्यावी. 
* डेंग्यूचे रुग्ण आढळल्यास डासांचा सोर्स शोधा. त्यासंदर्भात माहिती देऊन औषध फवारणी करावी. 
 
४) मुले आजारी पडली की बालरोग तज्ज्ञांना वेळेत दाखवा. औषधे वेळेवर, वजनानुसार असलेला डोस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार द्यावा. 
 
ताप असल्यास डिजिटल थर्मामीटरने काखेत थर्मामीटर ठेऊन चेक करावा. ९९ अंश सेल्सिअस च्या वर असेल डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तापाचे औषध द्यावे. नळाचे पाणी घेऊन स्वच्छ कॉटनच्या कपड्याने बाळाचे अंग पुसून घ्या. तापाचे औषध नंतर किती अंतराने देता येईल हे देखील डॉक्टरांकडून समजून घ्या. 
 
उलट्या, जुलाबांमुळे शरीरातील पाणी कमी होऊन बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो. WHO ORS नेहमी घरी उपलब्ध असावे. बाळाचे लघवीचे प्रमाण कमी असेल, बाळ सुस्त असेल, खाल्लेले काही पाचट नसेल तर त्वरित डॉक्टरांना भेटावे. 
 
अशाप्रकारे बाळाची योग्य काळजी घ्या व बाळ निरोगी ठेवा.