नळपाडा येथे सुपर स्पेशालिटी सरकारी कॅशलेस हॉस्पिटल सुरु

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

ठाणे : आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून मीरा-भाईंदरच्या धर्तीवर घोडबंदर येथील नळपाडा येथे १५० बेडचे सुपर स्पेशालिटी “मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक” या कॅशलेस रुग्णालयाची उभारणी करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले.

या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापन एका सेवाभावी संस्थेला देण्यात आले आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची ज्यांना माहिती आहे अशा संस्थेला हे हॉस्पिटलचे व्यवस्थापन देण्यात आले असून सर्व स्टाफ व हॉस्पिटलचे व्यवस्थापन ही संस्था सरकारच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे सांभाळणार आहे. लाखो रुपये ज्या ऑपरेशनसाठी बाहेर लागतात अशा मोठ्या सर्जरी येथे मोफत होण्यास आता सुरुवात होणार आहे. गरजूंना औषधेही मोफत देणार आहेत. २४ तास हॉस्पिटल गरजूना सेवा देणार आहे. हे कॅशलेस हॉस्पिटल असल्याने पेशंटच्या साध्या तपासणीपासून, विविध टेस्ट करणे आणि डॉक्टरांचे कन्सल्टिंग, पुढे आवश्यक असल्यास ऑपरेशन, त्यानंतर पुन्हा पुढील सर्व उपचार अशा सर्व आरोग्य सुविधा मोफत मिळणार आहेत. या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू न दिल्याने हे हॉस्पिटल आजपासून लोकांच्या सेवेत दाखल होणार असून हे हॉस्पिटल म्हणजे गरीब-गरजू रुग्णांसाठी एक वरदान ठरणार आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सर्व उपचार, कार्डिओलॉजी, अँजिओप्लास्टी, बायपास हृदय शस्त्रक्रिया, ब्लॉक बदलणे, पेसमेकर बसविणे अशा मोठ्या शस्त्रक्रिया, कॅन्सरवरील उपचार त्याचप्रमाणे इस्पितळात रक्त तपासणी, हेमेटोलॉजी, बायोकॅमिस्ट्री चाचणी, ईसीजी, सोनोग्राफी, 2डी इको, होल्टर, पीएफटी, एक्स-रे, कॅट्सकॅन, सीटी स्कॅन स्क्रिनिंग, यूरो शस्त्रक्रिया, न्यूरो सर्जरी जसे की कॅनिओटॉमी, हेमॅटोमा इव्हॅक्युएशन, स्पाइन सर्जरी, लॅमिनेक्टॉमी, स्त्रीरोग शस्त्रक्रिया जसे की हिस्टेरेक्टॉमी, डोके आणि मानेचा कर्करोग, स्त्रीरोग कर्करोग, पोटाचा कर्करोग इ. सारख्या ऑन्को शस्त्रक्रिया येथे होणार असून या सुविधा विनामूल्य (कॅशलेस) स्वरूपात पिवळ्या, केशरी तसेच शुभ्र शिधापत्रिका धारकांसाठी येथे सरकारी योजनेंतर्गत उपलब्ध होणार आहे. याप्रसंगी खासदार नरेश मस्के, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, माजी नगरसेविका परिषा सरनाईक, आशा डोंगरे, विधानसभा सचिव संदीप डोंगरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक या कॅशलेस रुग्णालयाचा फायदा ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील लोकमान्यनगर, वर्तकनगर, भीमनगर, शिवाई नगर, उपवन, येऊर येथील आदिवासी पाडे, वसंत विहार, घोडबंदर रोड व आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना घेता येणार आहे.