राज्यपालपदासाठी सुमित्रा महाजन उत्सुक

डोंबिवली: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा कोणत्याही क्षणी केंद्राकडून राजीनामा घेतला जाऊ शकतो, त्यामुळे आता महाराष्ट्राला नवे राज्यपाल कोण मिळणार? याची चर्चा सुरू झाली आहे. डोंबिवलीत आज माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी राज्यपालपदावर भाष्य केले. सुमित्रा महाजन यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.
मला महाराष्ट्राचे पालक करावे, मी रुजु होईन, असे वक्तव्य सुमित्रा महाजन यांनी केले. दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्याला पुन्हा उत्तराखंडला जायचे आहे असा मानस व्यक्त केला. त्यानंतर आता कोणत्याही क्षणी महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एक वृत्तवाहिनीला मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात नवे राज्यपाल येणार असून यासाठी तीन नावांची चर्चा आहे. यामध्ये सुमित्रा महाजन यांचे नाव आघाडीवर आहे. लवकरच नावाची घोषणा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांचे नाव चर्चेत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर थेट सुमित्रा महाजन यांनी उत्तर दिले आहे. पक्षाला सांगा मला महाराष्ट्राचे पालक करावे, मी जाईन, असे डोंबिवलीत बोलताना माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन म्हणाल्या.
मी याबाबत एकाने विचारलेल्या प्रश्नावर एकदा गंमतीने म्हटले होते की, पार्टीला सांगा की त्यांनी मला महाराष्ट्राचं पालक करावे. मी जाईन अशी प्रतिक्रिया महाजन यांनी दिली. डोंबिवलीत सुमित्रा महाजन यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेबाबत बोलत असताना त्यांनी राहुल गांधी यांचे कौतुक देखील केले.
सुमित्रा महाजन यांचा अल्प परिचय
इंदूर नगरपालिकेत वरिष्ठ नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा राजकीय प्रवास सुमित्रा महाजन यांचा आहे. राजकीय करिअरच्या सरतेशेवटी त्यांनी लोकसभा अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. महाराष्ट्रातील चिपळूणमध्ये 12 एप्रिल 1943 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्या सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित आहेत. लोकसभेत सलग आठ वेळा इंदुरचं प्रतिनिधित्व त्यांनी केले आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांत विरोधकांनी राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर राज्यपाल हटावचा नारा दिला होता. मात्र सत्ताधारी गटाचा वाढता विरोध झुगारून कोश्यारी यांनांच पदावर कायम ठेवले होते, पण आता विरोध मावळला असताना राज्यपालांनी राजीनाम्याची इच्छा थेट पंतप्रधानांकडे व्यक्त केली आणि पुन्हा राज्यपाल बदलांच्या चर्चांना तोंड फुटल्याचे पाहायला मिळाले.