रोहितचा उत्तराधिकारी ठरला?; गिल होणार कसोटी संघाचा कर्णधार

नवी दिल्ली: भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्माने काही दिवसांपूर्वीच कसोटी क्रिकेटला रामराम केला आहे. त्यामुळे बीसीसीआय नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी शुबमन गिल आणि ऋषभ पंतचं नाव चर्चेत आहे. दरम्यान माध्यमातील वृत्तानुसार, शुबमन गिल भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार बनणार असल्याचे म्हटले जात आहे.

बीसीसीआयच्या एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, २३ किंवा २४ मे रोजी बीसीसीआयची बैठक होऊ शकते. या बैठकीत गिलच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते. शुबमन गिलची अजीत आगरकर आणि गौतम गंभीरसोबत बैठक झाल्याचही म्हटले जात आहे.

येत्या जून महिन्यात भारतीय संघ पाच कसोटी मालिकांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. रोहितने निवृत्ती घेतल्यानंतर आता भारताला नवा कर्णधार मिळणार आहे. या दिवशी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा देखील केली जाऊ शकते. गिल पहिल्यांदाच इंग्लंड दौऱ्यावर भारती संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. ही आगामी विश्व कसोटी करंडक स्पर्धेतील भारताची पहिलीच मालिका असणार आहे. त्यामुळे गिलवर मोठी जबाबदारी असणार आहे.

शुबमन गिलच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने २०२० मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरूवात केली होती. त्याला आतापर्यंत ३२ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने ५९ डावात ३५.०५ च्या सरासरीने आणि ५९.९२ च्या स्ट्राईक रेटने १८९३ धावा केल्या आहेत.

गिलने अनेकदा डावाची सुरूवात केली आहे. मात्र, रोहित शर्माने यशस्वी जयस्वालसोबत डावाची सुरूवात केल्यापासून गिल तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत होता. आता रोहितने कसोटी क्रिकेटला रामराम केला आहे. त्यामुळे गिल पुन्हा एकदा सलामीला फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो.

शुबमन गिलकडे नेतृ्त्वाचा चांगलाच अनुभव आहे. काही आठवड्यांपूर्वी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी गिलकडे सोपवण्यात आली होती. या स्पर्धेत भारताने जेतेपद पटकावलं होतं. यासह त्याने भारतीय टी -२० संघाचे नेतृत्वही केले आहे. तसेच आयपीएल स्पर्धेत शुबमन गिल गुजरात टायटन्सचा कर्णधार देखील आहे. गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना गुजरात टायटन्सने दमदार कामगिरी केली आहे. हा संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे असून जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे.