कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 10 प्रभाग क्षेत्र कार्यालयासाठी एकूण 160 किलो वॅट क्षमतेची सौर उर्जा निर्मिती करणारी संयंत्रे कार्यान्वित केलेली आहेत. त्यामुळे महापलिकेच्या वीज बिलात मोठी बचत होत असून वीज निर्मितीच्या बाबतीत महापालिका सक्षम होऊ लागली आहे.
आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने सौर उर्जा क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. महापालिकेच्या मोहीली येथील जल शुध्दीकरण प्रकल्प व कपोते वाहनतळ येथे प्रत्येकी 120 किलो वॅट क्षमतेची सौर उर्जा निर्मिती करणारी संयंत्रे आस्थापित करण्यात आलेली आहेत. महापालिकेच्या 15 इमारतींवर 0.44 मेगा वॅट क्षमतेची सौर उर्जा संयत्रे आस्थापित असून प्रती वर्षी 6.34 लक्ष सौर उर्जा युनिट उत्पादन होत आहे.
कल्याण-डॉबिवली महानगरपालिका क्षेत्रात सन 2007 पासून नविन इमारतीवर सौर उर्जा संयंत्रे उभारणे पासून बंधनकारक केलेले आहे ,सौर उर्जा संयंत्रे उभारल्यानंतरच विकासक यांना नविन इमारतीसाठी नगररचना विभागाकडून भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येते. सन 2007 ते 2021 या कालावधीत 1832 इमारतींवर 1,10,22,585/- लिटर्स प्रती दिन क्षमतेच्या सौर उष्ण जल संयत्राची उभारणी विकासकाकडून करण्यात आली आहे. सौर उष्ण जल संयत्रामुळे महापालिका क्षेत्रातील इमारती मधील गरम पाणी करणेसाठी विजेचा भार कमी झाला असून दरवर्षी 18 कोटी पारंपारीक वीज युनिटची बचत होत आहे.
सन 2021 पासून नगरविकास विभागाच्या युनिफाईड विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली नुसार महानगरपालिका क्षेत्रातील नविन इमारतीवर सौर उर्जा निर्मिती करणारी सौर संयंत्रे बसविणे बंधनकारक केलेले आहे. सन 2021 ते डिसेंबर 2024 अखेर पर्यंत एकूण 194 नविन इमारतीवर 3.5 मेगा वॅट क्षमतेची सौर उर्जा निर्मिती करणारे सौर संयत्रे विकासकाकडून आस्थापित करुन घेण्यात आलेली आहेत. सौर उर्जा निर्मिती प्रकल्पातून दरवर्षी 50.40 लक्ष सौर उर्जा वीज युनिटची निर्मिती होणार आहे. या हरित उर्जा निर्मितीतून इमारतीसाठी आवश्यक उदवाहन, वॉटर पंप,पॅसेज लाईट,आऊट डोअर लाईट या सामायिक बाबींसाठी आवश्यक विजेची गरज भागणार आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील शाळा, कॉलेज, रहिवासी संस्था, सरकारी कार्यालये, मॅराथॉन स्पर्धा, डोंबिवली जिमखाना उत्सव या सार्वजनिक ठिकाणी महापालिकेच्या विद्युत कर्मचाऱ्यांनी स्वतः तयार केलेल्या पथनाट्याचे एकूण 26 प्रयोग करुन सौर ऊर्जेबाबत जनजागृती केली. तसेच दि. 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2024 या राष्ट्रीय उर्जा संवर्धन सप्ताहात आकर्षक माहिती पत्रकांच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी उर्जा संवर्धन व सौर उर्जा या बाबत मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात आली. सौर उर्जा ही हरीत उर्जा असून काळाची गरज आहे. सौर उर्जा संयंत्रे आस्थापित करणा-या नागरीकांना महापालिकेतर्फे दरवर्षी मालमत्ता करात 1 टक्के सुट देण्यात येते, त्यासाठी नागरीकांनी सौर उर्जा संयंत्रे कार्यान्वित असल्याचा दाखला दरवर्षी महापालिकेत सादर करावा लागतो अशी माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.