सुभाष पवार यांचा शरद पवार गटात प्रवेश

मुरबाड : ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व शिवसेनेचे भिवंडी लोकसभा सहसंपर्क प्रमुख सुभाष पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आज प्रवेश केला.

या प्रवेशाने महायुतीला मुरबाड, शहापूर आणि कल्याण तालुक्यात धक्का बसला असून, भाजपाचे मुरबाडमधील उमेदवार व आमदार किसन कथोरे यांना अडचण निर्माण झाली आहे.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी सुभाष पवार यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश पवार, धनाजी दळवी, ज्येष्ठ नेते रामभाऊ दळवी, माजी जिल्हा परिषद सदस्या प्राजक्ता भावार्थे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी उपसभापती भारती पष्टे, युवा सेना तालुकाप्रमुख सागर कडव आदींनीही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी माजी आमदार गोटीराम पवार यांचीही उपस्थिती होती.

या प्रवेशानंतर सुभाष पवार यांनी पक्षाध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे चार वेळा आमदार गोटीराम पवार यांनी प्रतिनिधित्व केले होते.गोटीराम पवार कुटुंबीयांना मानणारा मुरबाड तालुक्यात मोठा वर्ग आहे. त्यामुळे महायुतीच्या विजयाचा समीकरणांना धक्का पोहोचणार आहे. २००९ मध्ये गोटीराम पवार यांनी विधानसभा निवडणूक अपक्ष लढविली होती. त्यावेळी त्यांनी ५० हजार मते मिळविली होती. गोटीराम पवार यांचे पुत्र सुभाष पवार यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. त्याचबरोबर त्यांनी शिवसेनेची संघटना मुरबाड तालुक्यात वाढविण्यात मोलाचे योगदान दिले होते. मात्र, आता त्यांनी पक्षांतर केल्यामुळे महायुतीला धक्का बसणार आहे.

मुरबाड तालुक्यातील सहकार संस्थांवर गोटीराम पवार यांचे प्रभुत्व आहे. त्यातून ठाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार किसन कथोरे यांच्या समर्थकाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. आता महाविकास आघाडीची उमेदवारी सुभाष पवार यांना मिळाल्यामुळे मुरबाड विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार आहे.

भाजपातील गटबाजीबरोबरच किसन कथोरे यांना सुभाष पवार यांच्याबरोबरही दुहेरी सामना करावा लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत कथोरे समर्थकांनी कपिल पाटील यांच्या विरोधात मतदान केल्यामुळे भाजपामध्ये अंतर्गत नाराजी आहे. त्यातून त्यांचा माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याबरोबर संघर्ष सुरू आहे.