विद्यार्थ्यांची दाखल्यांसाठी परवड; अधिकारी-कर्मचारी सापडेनात !

ठाणे : विद्यार्थ्यांच्या शाळा कॉलेज प्रवेशाचे वारे जोरात वाहू लागले असून त्यासाठी आवश्यक दाखल्यांसाठी तहसीलदार कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून गर्दीचा उच्चांक होत आहे. मात्र निवडणुकीमुळे कार्यालयात सापडत नसलेले अधिकारी-कर्मचारी आता देखील जागेवर दिसत नसल्याने विद्यार्थ्यांची परवड झाली आहे.

शाळा आणि कॉलेज प्रवेशासाठी लागणारे दाखले मिळवण्यासाठी ठाणे तहसीलदार कार्यालय परिसरात सध्या विद्यार्थी आणि पालकांची झुंबड उडालेली दिसत आहे. मागील अनेक दिवस अधिकारी आणि कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. आता देखील तहसीलदार कार्यालयात ते उपलब्ध होत नसल्याचा आरोप होत असून विद्यार्थ्यांच्या शाळा-कॉलेज प्रवेशाचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. ठाणे शहराचे माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते यांनी विद्यार्थ्यांच्या या समस्येची दखल घेऊन तहसीलदार कार्यालयाला भेट दिली असता त्यांना अधिकारी कर्मचारी वर्ग जागेवर दिसून न आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्याप्रमाणे मराठा समाज बांधवांसाठी ओबीसी दाखले देण्यासाठी युद्ध पातळीवर मोहीम हाती घेण्यात आली, स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला, त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी युद्ध पातळीवर मोहीम हाती घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा सोमवारपासून तहसील कार्यालयातच आंदोलन करू, असा इशारा श्री.साप्ते यांनी दिला आहे. दाखले मिळवून देण्यासाठी येथे खासगी व्यक्ती दीड ते तीन हजार रुपये सर्वसामान्यांकडून उकळत असून या दलालांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.