मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांचा ‘स्ट्रॉंग’ बंदोबस्त

स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी ७५ सीसी टीव्ही आणि १००हून जास्त पोलीस तैनात

निखिल बल्लाळ/ठाणे

ठाण्यातील आनंदनगर परिसरात असलेल्या न्यू होरायजन स्कॉलर्स स्कुलमध्ये तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रुमच्या सुरक्षेसाठी ७५ सीसी टीव्ही बसवण्यात आले आहेत. १००हून जास्त पोलीस कर्मचारी देखील दिवस-रात्र या स्ट्रॉंग रुमच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत.

२० मे रोजी ठाणे लोकसभेचे मतदान झाले. त्यानंतर सर्व मतदान यंत्रे या स्ट्रॉंग रुममध्ये ठेवण्यात आली आहेत. या स्ट्रॉंग रुमची तयारी एक महिना आधी सुरु झाली. न्यू होरायजन शाळेच्या पहिल्या मजल्यावरील प्रत्येक वर्गाचे स्ट्रॉंग रुममध्ये रूपांतर करण्यात आले आहे. प्रत्येक स्ट्रॉंग रुममध्ये सीसी टीव्ही बसवण्यात आले असून पहिल्या मजल्यावर कोणालाही जाण्याची परवानगी नाही.

ज्यांना परवानगी आहे अशा काही ठराविक सरकारी अधिकाऱ्यांची देखील चौकशी आणि तपासणी सीआरपीएफ आणि एसआरपीएफ पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यानंतरच त्यांना पहिल्या मजल्यावर पाठविण्यात येत आहे. जे सीसी टीव्ही बसविण्यात आले आहेत त्यांचे प्रक्षेपण उमेदवारांच्या प्रतिनिधींना सुद्धा पाहायला मिळत आहे. प्रत्येक पक्षांच्या उमेदवारासाठी या शाळेच्या आवारात तंबू बांधण्यात आला आहे. तिथे पक्षातील प्रतिनिधी हे प्रक्षेपण २४ तास पाहू शकतात.

ठाण्यातील लोकसभेचे काही उमेदवार ही सुरक्षा पाहण्यासाठी स्वतः येत असतात. ४ जून रोजी मतमोजणी होईपर्यंत ही सुरक्षा ठेवण्यात येणार आहे.