पाण्यासाठी ठामपा मुख्यालयात ठिय्या

टँकर माफियांसाठीच कृत्रिम पाणीटंचाई-शानु पठाण

ठाणे : ठाणे, मुंब्रा-कौसा भागात गेल्या चार दिवसांपासून पाणीटंचाई भेडसावत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी आणि स्टेमचा शटडाऊन संपल्यानंतरही पाणी सोडण्यात येत नसल्याने संतप्त झालेले माजी विरोधी पक्षनेते अश्रफ (शानू) पठाण यांनी पालिका आयुक्त सौरव राव यांच्या दालनासमोरच आंदोलन केले. त्यामुळे पालिका मुख्यालयात बराच गोंधळ माजला होता.

धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने दहा टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ठाणे शहरातील काही भाग आणि कळवा, मुंब्रा, कौसा परिसरात गेले चार दिवस पाणीपुरवठाच करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांना टँकरवर पैसा खर्च करावा लागत आहे. याबाबत शानू पठाण आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयात धडक देऊन पालिका आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या धरून बसले. त्यामुळे पालिका मुख्यालयात गोंधळ माजला होता. शानू पठाण यांच्या आंदोलनानंतर पाणीपुरवठा अभियंता विनोद पवार यांनी पठाण यांची भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी पठाण म्हणाले की, ठाणे शहरात 10 टक्के पाणीकपात करण्यात आली असली तर 90टक्के पाणीपुरवठा केला जात नाही. गेल्या चार दिवसांपासून पाणीच सोडण्यात आले नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मुंब्रा-कौसा भागातील नागरिकांना गेल्या तीन दिवसांत सुमारे ५० लाख रूपयांचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. ठामपाचे काही अधिकारी टँकर लाॅबीचे हीत सांभाळण्यासाठी पाणी सोडत नाहीत. टँकर लाॅबीकडून मोठा मलिदा मिळत असल्यानेच नागरिकांना छळले जात आहे येत्या सोमवारपर्यंत जर पाणीपुवठा नियमित केला नाही तर पालिका आयुक्तांच्या घरासमोर दहा हजार नागरिकांसह आंदोलनाला बसू, असा इशाराही पठाण यांनी दिला.