थकबाकीमुळे पुरवठादाराकडून औषध पुरवठा बंद; रुग्णांचे हाल

मध्यवर्ती रुग्णालयात औषधांचा तुटवडा

उल्हासनगर : उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात औषध बिलाची लाखो रुपयांची थकबाकी आहे. शासनाने अनुदान न दिल्याने मध्यवर्ती रुग्णालय प्रशासन पुरवठादारास थकीत बिल देण्यास असमर्थ आहे, त्यामुळे पुरवठादाराने गेल्या चार महिन्यांपासून औषधे देणे बंद केले आहे. रुग्णालयात औषधे उपलब्ध नसल्याने गरीब व आदिवासी रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.

राज्य सरकारने 15 ऑगस्ट 2023 रोजी मोफत उपचार योजना सुरू केली. ही योजना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातही सुरू करण्यात आली. दरमहा सुमारे दोन हजार ओपीडी रुग्ण येतात. याशिवाय मध्यवर्ती रुग्णालयात 201 खाटांचे रुग्णालय आहे. त्यामध्ये रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. या रुग्णालयात उल्हासनगर व्यतिरिक्त जवळच्या अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब व आदिवासी रुग्ण देखील उपचारासाठी येत असतात.

औषधे, प्रयोगशाळेतील रसायने व अन्य इतर सामग्रीचा खर्च 35 लाख 16,828 रुपये झाला. या रकमेपैकी तीन लाख 6,560 रुपये प्रयोगशाळेच्या साहित्याचा खर्च आहे, मात्र गेल्या चार महिन्यांपासून शासनाने अनुदान दिले नसल्याने औषधांचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. रुग्णांना मोफत औषध देणे बंद करण्यात आल्याने रुग्णांना स्वतःच्या खर्चाने औषध घ्यावे लागते, यात गरीब, आदिवासी रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहे. दुसरीकडे मेडिकल स्टोअर्सचे मालक आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. मोफत औषध योजना केवळ मध्यवर्ती रुग्णालयातच नाही तर बदलापूर ग्रामीण, अंबरनाथच्या छाया हॉस्पिटलमध्येही आहे.

याबाबत उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोहर बनसोडे यांना विचारले असता ते म्हणाले की 25 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे यांना लेखी माहिती दिली आहे. पूर्वी केसपेपर आणि उपचारासाठी दहा रुपये घेतले जात होते त्यामुळे काहीतरी उत्पन्न मिळत होते. मात्र त्या नंतर सरकारने ते देखील बंद केल्याने उत्पन्नाचे स्तोत्र शिल्लक राहिलेले नाही.

उल्हासनगर शहराचे मध्यवर्ती रुग्णालयातील कल्याण लोकसभा क्षेत्रात येत असून या क्षेत्राचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे स्वतः डॉक्टर आहेत, त्यांच्या पुढकाराने अंबरनाथ शहरांमध्ये मेडिकल कॉलेजच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे तसेच उल्हासनगर महापालिकेने स्वतःचे रुग्णालयही सुरू केले आहे, मात्र गेल्या चार महिन्यापासून मध्यवर्ती रुग्णालयात औषध उपलब्ध नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची परिस्थिती फार बिकट झालेली आहे. याबाबत ते अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील स्थानिक नेते देखील याप्रकरणी लक्ष देत नसल्याच्या तक्रारी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.