वावीकर आय इन्स्टिट्यूटमध्ये चष्म्याचा नंबर काढण्याचे अत्याधुनिक मशीन दाखल

ठाणे : डोळ्यांच्या चष्म्याचा नंबर काढण्यासाठी ठाण्यातील वावीकर आय  इन्स्टिट्यूटमध्ये  अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त मशिन दाखल झाले आहे. या मशिनच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करुन चष्म्याचा नंबर काढला जाणार असल्याची माहिती इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा डॉ. चंद्रशेखर वावीकर यांनी दिली आहे.

प्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे हे वावीकर आय इन्स्टिट्यूटचे आता ब्रँड ॲम्बेसेडर असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. माजिवडा सर्व्हिस रोड येथील वावीकर आय इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक मशीन दाखल झाले असून त्याची माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ, डॉ. वैशाली वावीकर, सरस्वती विद्या प्रसारक ट्रस्ट संस्थेच्या अध्यक्षा मीरा कोरडे, ‘ठाणेवैभव’चे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ आदी उपस्थित होते.
काही वर्षांपूर्वी माझ्या डोळ्याला जखम झाली होती त्यावेळी वावीकर आय इन्स्टिट्यूटमध्ये उपचार घेतले. माझे सासरेही येथेच डोळ्यांवर उपचार घेतात. त्यामुळे इन्स्टिट्यूटशी कौटुंबिक नाते असल्याचे अभिनेता श्रेयस तळपदे यांनी सांगितले. वावीकर आय इन्स्टिट्यूटने ठाण्यातच नव्हे तर आशियामध्ये नेहमीच पहिल्यांदा नवनवीन तंत्रज्ञान आणल्याचे सांगत इन्स्टिट्यूट ग्रामीण भागात आपल्या मोबाईल आय व्हॅनच्या साहाय्याने करत असलेल्या सेवा कार्याचेही श्रेयस तळपदे यांनी कौतुक केले. स्मार्टसाईट यंत्राद्वारे शस्त्रक्रिया करणारे हे नवीन मशिन अत्याधुनिक आहे. रुग्णांच्या आवश्यकतेनुसार या तंत्रज्ञानाचा वापर होतो. पूर्वी पारंपरिक लॅसिक सर्जरी केली जायची, आता या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे लॅसिक सर्जरीला एक नवीन पर्याय तयार झाला आहे, जो अधिक अचूक आणि सुरक्षित परिणाम रुग्णांना देणार आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आतापर्यंत 14 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतरच आज उद्घाटन करत असल्याची माहिती डॉ. चंद्रशेखर वावीकर यांनी दिली.