मविआच्या ८५-८५-८५ फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर असून आज तिन्ही प्रमुख पक्षांनी ८५-८५-८५ अशा नव्या फॉर्म्युल्यावर एकमत केलं असून उर्वरित ३३ जागांवर उद्या अन्य मित्रपक्षांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

याबाबत आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

मविआच्या जागावाटपाची माहिती देताना संजय राऊत म्हणाले की, “आम्ही तूर्तास ८५-८५-८५ असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवलेला आहे. आमचे जे अन्य मित्रपक्ष आहेत त्यांना १८ जागा देण्यात येतील आणि उर्वरित जागांबाबत उद्या पुन्हा चर्चा करून निर्णय घेतला जाईल. आमच्या जागावाटपावरून ज्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या त्यांना सांगा की सगळं सुरळीत झालं आहे,” असा टोला राऊत यांनी महायुतीला लगावला.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास कालपासून सुरुवात झाली असली तरी महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित होत नसल्याने मविआचे इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्येही गोंधळ होता. हा गोंधळ दूर करण्यासाठी मविआतील तिन्ही पक्षांनी २५५ जागांचे वाटप निश्चित करत तात्पुरता तोडगा काढल्याचं दिसत असून उर्वरित ३३ जागांवर काय निर्णय घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.