ठाण्यातील हजारो झोपडी धारकांना मिळणार दिलासा
ठाणे: ठाणे शहरात लागू केलेल्या क्लस्टर योजनेत एसआरए प्रक्रिया सुरू असलेल्या झोपडपट्ट्यांचाही समावेश करण्यात आल्याने हजारो झोपडीधारकांच्या डोक्यावर अस्थिरतेची टांगती तलवार होती, मात्र आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात आवाज उठवून हा प्रश्न धसास लावल्याने राज्य शासनाने १६ एसआरए प्रकल्प वगळण्याच्या दिशेने हालचाल सुरू केली आहे.
ठाणे शहरात क्लस्टर योजना लागू केल्यामुळे कोपरी, ठाणे शहर, वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, वर्तकनगर आदी भागातील १६ एसआरए प्रकल्पांना ब्रेक लागला होता. आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात आवाज उठवल्यानंतर राज्य शासनाने या प्रकल्पांबाबत बैठका घेऊन त्यावर विचारविनिमय सुरु केला आहे. त्यामुळे रखडलेल्या एसआरए योजनेच्या प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात क्लस्टरचे ४४ युआरपी तयार करण्यात आले असून त्यापैकी सात युआरपीचे नकाशे अंतिम करण्यात आले आहेत. उर्वरीत युआरपी अद्याप अंतिम झालेले नाहीत. असे असताना, देखील अनेक ठिकाणी क्लस्टरचे आरक्षण टाकण्यात आल्यामुळे अधिकृत इमारतींचा पुनर्विकासा थांबला होता. दुसरीकडे १९९ झोपडपट्ट्यांपैकी ११२ झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी महापालिकेने क्लस्टर योजना राबविण्याचे निश्चित केले आहे. यातील अनेक झोपडपट्ट्यांचे एसआरएच्या माध्यमातून सर्व्हेक्षण झाले आहे, काही झोपडपट्ट्यांच्या विकासाची कामेही सुरु झाली आहेत. काही ठिकाणी तर नागरीकांना भाडे देण्याची प्रक्रियाही सुरु झाली आहे. असे १६ प्रकल्प युआरपीमध्ये येत असल्याने त्यांच्या प्रक्रियेलाच ब्रेक लागला होता.
भाजपचे आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात आवाज उठवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगर विकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर शासनाने यात आता लक्ष घातले असून यावर काय उपाय योजना करता येऊ शकते, याचा विचार सुरु केला आहे. शासनस्तरावर बैठका सुरु असून येत्या काही दिवसात क्लस्टरच्या कात्रीत अडकलेल्या या १६ प्रकल्पांना दिलासा मिळणार असल्याची माहिती एसआरएमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
क्लस्टर योजनेतून अधिकृत इमारतींना वगळण्याबाबत मी पाठपुरावा केल्यानंतर त्याबाबत शुद्धिपत्रक काढण्यात आले आणि या इमारतींचा स्वतंत्रपणे पुनर्विकास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच एसआरए प्रक्रिया सुरू असलेल्या १६ प्रकल्पांना वगळण्याबाबतही पाठपुरावा सुरू आहे. हा प्रश्न मार्गी लागत असेल तर ही स्वागतार्ह बाब आहे. पण आगामी काळात या प्रकल्पांच्या प्रतिनिधींची एकत्रित बैठक घेणार असून याबाबत राज्य शासनावर दबाव वाढवण्यासाठी मी प्रयत्नशिल असणार आहे, असे आमदार संजय केळकर यांनी ‘ठाणेवैभव’शी बोलताना सांगितले.
पाचपाखाडी, चेंदणी कोपरी, माजिवडे, कोपरी (ठाणेकरवाडी),पाचपाखाडी (सर्व्हे नं ४४७ पैकी ४४८), मौजे ठाणे, भीमनगर (वर्तकनगर), मौजे पाचपाखाडी (प्लॉट नं ३९२), मौजे ठाणे (मार्क्स नगर, आंबेघोसाळे तलाव, मीनाताई ठाकरे चौक), नौपाडा (बी केबिन), मौजे ओवळा, चरई, मौजे पाचपाखाडी (भूमापन क्रमांक १६३/३/ ब), मौजे चेंदणी (नगर भूमापन क्रमांक ९६० ते ९७९) आदी प्रकल्पांना दिलासा मिळणार आहे.