अध्यात्म हाच मनःशांतीचा पाया

मना मानसी दुख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे |
विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी, विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी ||
समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला शेकडो वर्षांपूर्वी उपदेश केला आहे. आपले मन वळविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, आपले दुःख दळण मात्र सुरूच आहे. थोड्याफार फरकाने सगळ्यांची हीच कहाणी आहे, स्वतः बाबत, इतरांबाबत, परिस्थितीबाबत असंतोष! प्रत्येकाने स्वतःच्या उराशी काहीतरी दुःख बाळगले आहे. रोजच्या धावपळीत खूपदा मनुष्य ते विसरून जातो, पण अंतर्मनात खोलवर किती काही दडलेले असते. कधीतरी ते उफाळून वर येते, स्फोट होतो, तोल जातोय असे वाटते. माझे काहीतरी बिनसले आहे, मला घुसमटल्यासारखे वाटते आहे, मला मदतीची गरज आहे ही जाणीव सुद्धा कित्येक लोकांना नसते. शरीराचा ताप आपण अनेक महिने, अनेक वर्षे सहन करतो का? मग मनाचा ताप का करावा? बाहेरील जंतूंमुळे जसा शरीराला आजार होतो तसा मनालाही होतो, त्याला मुग गिळून गप्प का करावे?  वेळीच त्यावर उपाययोजना करणे योग्य नव्हे का?
मनाचा ताप कमी करण्याचा उपाय आहे अध्यात्म! म्हणजे आत वळून बघणे, ज्याला हल्लीच्या भाषेत रिट्रोस्पेक्शन वगैरे म्हणतात ते! अध्यात्म म्हणजे देवदेव करणे, पोथी वाचत बसणे, हातात जपमाळ घेऊन ओढत बसणे नाही. अध्यात्म म्हणजे स्वतःला तपासून बघणे. त्यासाठी जाणत्याची म्हणजे आपल्या गुरुची मदत घेणे. आपल्या पंचकोशांपैकी मनोमय कोशाच्या ठिकाणी प्रचंड शक्ती असते. ती खूपदा चिंता आणि काळजी करण्यामध्ये खर्च होत असते. म्हणून आपण रोज घरी केरकचरा काढून स्वच्छता करतो तशी मनोमय कोषाची दररोज शुद्धी करणे आवश्यक आहे. रोज थोडावेळ प्राणायाम आणि ध्यानधारणा केल्यामुळे आपल्याला फायदा होतो हे आज अनेकांना माहित आहे, नाही असे नाही. पण ते रोज केले जाते का? आसन लावून ध्यान करायला वेळ मिळेलच असे नाही, मग प्रवासात गप्पागोष्टी / गॉसिप करण्यापेक्षा ऑफिसला जाताना काही स्तोत्र ऐकून किंवा मनःशांतीचे लेक्चर ऐकून मन शांत होत असेल तर बिघडले कुठे? गर्दीत उभे राहून आपले स्टेशन येण्याची वाट बघत इकडेतिकडे बघण्यापेक्षा तो वेळ आतमध्ये डोकावून पाहण्यासाठी उपयोगी केला तर? स्पिरिचुआलिटी म्हटले कि फॅशन वाटते आणि अध्यात्म म्हटले कि जुनाट, जड असे का? खरे तर अध्यात्म हाच शांतपणे आयुष्य जगण्याचा आणि मनःशांतीचा पाया आहे. कसे, ते जाणून घेऊया पुढच्या लेखात!

– आरती भार्ज,
मानसिक विकास सल्लागार, ध्यान प्रशिक्षक

983393955 / coachaartibharj@gmail.com