दैनंदिन जीवनात अध्यात्म

अध्यात्म म्हणलं, की काहीतरी गूढ, गंभीर, गहन, अनाकलनीय असं वाटतं. कळायला कठीण आणि आचरणात आणायला अवघड. पण वयाची साठी उलटली, संतमंडळींच्या आध्यत्मिक पुस्तकांचं वाचन सुरु केलं, त्यातलं तत्वज्ञान कळावं, म्हणून परीक्षा द्यायला सुरुवात केली आणि करोना आला. बऱ्याच गोष्टी पहिल्या, वाचल्या, अनुभवल्या. त्या अध्यात्म कळायला उपयोगी ठरल्या.

 

आपले ऋषी, मुनी, संत यांनी अध्यात्म पाहिलं, अनुभवलं व ते जगलेही. जो आनंद त्यांनी अनुभवला तो आपल्यासारख्या सामान्यांनाही अनुभवता यावा, म्हणून शब्दबद्धही केला. भारत ही देवभूमी आहे. हे ऋषी निर्मित राष्ट्र आहे. अध्यात्म आपल्या रक्तातच आहे. ती एक जीवनपद्धती आहे. आपण स्वतःला त्या ईश्वराचे अंश मानतो, अमृताचे पुत्र मानतो. तो आनंदस्वरूप आहे म्हणजे आपणही आनंदरुपच आहोत. त्याच्या अनुसंधानात राहावे, त्याच्या नजरेखाली शरीराने कर्तव्य करावे, व करू ते कर्म त्यालाच अर्पण करावे. या मानसिकतेमुळे जे काम करू ते उत्तम होते, करता – करविता तो असल्याने कर्मफळापासूनही सुटका होते.

 

व्यवहारात महत्वाचं म्हणजे मनाला एक प्रकारचे स्थैर्य येते. उद्वेग, चिडचिड, ताण कमी होतो. दुसऱ्याकडून अपेक्षा कमी होतात. आनंद, समाधान माझ्या आत आहे, ही साक्ष पटायला लागते. वृत्ती समतोल होते. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद गवसू लागतो. मात्र यासाठी मानसिक, भावनिक, बौद्धिक परिवर्तन विचारपूर्वक घडवून आणावे लागते. ही एक अनुभूती आहे, कबीरांच्या शब्दात, गूंगेका गुड…!
 
– संध्या टेंभे 
स्वामी विवेकानंद केंद्र