कल्याण: अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडाच्या पायथ्याशी सुरू असणाऱ्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहात सातव्या दिवशी दीपोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जणू हजारो चांदण्या जमिनीवर उतरल्याचा भास होत होता.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकण प्रांतातील या सर्वात मोठ्या अखंड हरिनाम सप्ताहाचा अर्थातच श्रीमलंगगड हरिनाम महोत्सवाचा गेल्या आठवड्यात प्रारंभ झाला. महोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचा सोमवारचा आठवा दिवस संस्मरणीय ठरला. एकीकडे आपल्या स्वतेजाने गेल्या अनेक दशकांपासून समाजातील अंधकार दूर करणाऱ्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, संतश्रेष्ठ तुकोबाराय आणि संतश्रेष्ठ नामदेव रायांच्या वंशजांची प्रमुख उपस्थिती तर दुसरीकडे सभामंडपात उपस्थित असलेल्या वारकरी बंधू आणि भगिनींकडून प्रज्वलित झालेले हजारो दिपांचे तेज. असा अनोखा दुग्धशर्करा योग याठिकाणी जुळून आल्याचे दिसून आले.
या दीपोत्सवाची सुरुवात उपस्थित साधू संतांनी दीपमंत्राच्या उच्चाराने केल्यानंतर आधी व्यासपीठावरील समई प्रज्वलित करण्यात आल्या. त्यानंतर सभामंडपात उपस्थित असणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याने आपल्याकडील दिवा प्रज्वलित केला. यावेळी सभामंडपात निर्माण झालेले दृश्य हे अतिशय उत्कट आणि देदीप्यमान असे होते. या दीपोत्सवात सहभाग घेणाऱ्यांना एका सर्वोच्च समाधानाची अनुभूती अनुभवायला मिळाली. या दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमानंतर जय श्रीरामाचा जयघोष, श्री मच्छिंद्रनाथांचा जयघोष, संत श्री ज्ञानेश्वर माऊलींची आरती आणि त्यानंतर पसायदान झाले. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या हरिभक्तांनी एकत्रितरित्या पसायदान म्हणत संपूर्ण श्रीमलंगगड परिसर भारावून गेला.