आयुक्तांकडून दोन जणांवर अस्वच्छतेबद्दल दंडात्मक कारवाई
ठाणे : सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, जन्म दाखल्यासाठी पैसे मागणे यासारख्या ठामपा कर्मचाऱ्यांच्या वर्तनामुळे शहराची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली होती. बुधवारी झालेल्या दौऱ्यातही आयुक्तांनी आणखी दोन नागरिकांवर कारवाई केली.
ॲपलॅब कंपनीच्या चौकात पाहणी सुरू असताना एक रिक्षाचालक व्यक्ती, चित्रांनी सुशोभित केलेल्या भिंतींवर लघुशंका करताना आढळली. त्यांना जागेवरच दंड करण्याचे निर्देश आयुक्तांनी उपायुक्त शंकर पाटोळे यांना दिले. तिथे असलेल्या स्वच्छता निरीक्षकाने दंडाची कारवाई केली.
पाठोपाठ, वागळे इस्टेट येथे नाल्याची पाहणी सुरू असतानाच तिथेच रस्त्याच्या बाजूला लघूशंका करणाऱ्या दुसऱ्या नागरिकालाही दंड करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. त्याचप्रमाणे, स्वच्छता निरीक्षकाने कारवाई केली.
शहर सुशोभिकरण, स्वच्छता मोहीम यातून शहरातील स्वच्छतेचे भान वाढविण्याचा पालिका आटोकाट प्रयत्न करत आहे. त्या प्रयत्नांना अशा बेशिस्त वर्तनामुळे तडा जातो. त्यामुळे कारवाईची अप्रिय भूमिका घ्यावी लागते, असे या घटनांबद्दल आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले.
नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकताना, लघूशंका करताना, थुंकताना आपल्या शहराचा विचार करावा आणि अशा बेशिस्त वर्तनापासून दूर रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.