ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या संभाव्य पूर आणि पाणी साचण्याच्या घटना यांची आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि संबंधित यंत्रणा यांना आगावू सूचना देणाऱ्या सहा सेन्सर्सच्या देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे संभाव्य आपत्तीचे व्यवस्थापन प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे.
ठाणा कॉलेज, वृंदावन पंपिंग स्टेशन, साकेत पाइपलाइन, मुंब्रा स्मशानभूमी, हिरानंदानी इस्टेट आणि गायमुख वॉटरफ्रंट या सहा ठिकाणी हे स्वयंचलित सेंसर्स काही वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांचा प्रभावी वापर करण्याची सूचना ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखड्यात करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेसाठी कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हार्यन्मेंट ॲण्ड वॉटर (सीईईडब्ल्यू) या वातावरण बदल क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने हा कृती आराखडा तयार केला आहे. पावसाळापूर्व आढावा बैठकीत या सेन्सर्सच्या स्थितीची चर्चा झाली होती.
पावसाचे प्रमाण जास्त असल्यास त्यांची सूचना या सेन्सर्सच्या माध्यमातून स्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये सूचना दिली जाते. त्यानुसार, मग संबंधित विभाग, प्रभाग समिती, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांना तातडीने संदेश पाठवले जातात. त्यामुळे, पूर स्थिती, पाणी साठणे आदींचा सामना करणे यंत्रणेला शक्य होते.
अतिवृष्टीच्या काळात सखल भागात साठणारे पाणी, भरतीच्या काळात असताना पावसाच्या पाण्याला खाडीत जाण्यापासून होणारा अडथळा, महापालिका क्षेत्रातील पर्जन्य जल वाहिन्यांचे जाळे, नाल्यातील कचऱ्याचा उपद्रव आदींमुळे वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. काही प्रसंगात जीवितहानी होण्याचीही भीती असते. या सर्व स्थितीचा अभ्यास करून ही पूर सदृश स्थिती कशी हाताळायची, त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे याचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.