शिळ-दिवामध्ये सहा मोटर पंप जप्त, ११ नळजोडण्या खंडित

पाणीपट्टी थकबाकीदारांवर पालिकेची कारवाई

ठाणे : ठाणे महापालिकेची पाणी बिल थकबाकी वसुलीकरता पाणी पुरवठा विभागाने कारवाई सुरू केली आहे. या मोहिते शिळ-दिवा भागात सहा मोटर पंप जप्त करण्यात आले. तर, ११ नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. पाणी बिलाची रक्कम भरून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळजोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळजोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रुम सील करण्यात येत आहेत. पाणी बिलाचा भरणा न करता, खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करुन घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचीही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.

महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनाच्या थकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सूट लागू करण्यास महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मान्यता दिली आहे. थकीत पाणीपट्टी बिलावरील दंडात १०० टक्के इतकी भरीव सवलत जाहीर करण्यात आल्याने नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

ही योजना १ सप्टेंबर २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत लागू राहील. वरील योजनेचा लाभ घेऊन थकीत व चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरुन त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सवलत योजनेचा लाभ नागरिक घेवू शकतील. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बील धारकांनी पाणी पुरवठा देयके जमा केली असतील अशांना सदरची सवलत योजना लागू असणार नाही. तसेच ही योजना व्यवसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही.