अंबरनाथ: जम्मू-काश्मीरच्या पेहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अंबरनाथ शहरात काँग्रेसने बंद पुकारला होता. त्याला समिश्र प्रतिसाद मिळाला. दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अंबरनाथ शहर ब्लॉक काँगेसच्या वतीने अंबरनाथ शहरात ‘बंद’ चे आवाहन करण्यात आले होते.
आज सोमवारी सकाळी शहराच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही भागातील व्यापारी, रिक्षा संघटना, कामगार संघटना, हॉटेल असोसिएशन आणि नागरिकांनी बंदमध्ये सहभाग घेतला. अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा रसाळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली बंद पुकारण्यात आला होता. बंद आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले होते. त्यानुसार शहरातील विविध रिक्षा संघटना, हॉटेल असोसिएशन, व्यापारी संघटना यांनी शांततेत अंबरनाथ बंद आंदोलनाला प्रतिसाद दिला. काही प्रमाणात रिक्षा सुरू असल्याने नागरिकांना बंदचा फारसा त्रास जाणवला नाही. तर दुपारनंतर शहरात सर्व काही सुरळीत सुरू झाले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा रसाळ पाटील, सरचिटणीस रोहितकुमार प्रजापती यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागात काँगेसच्या पदाधिकाऱ्यांनी पाकिस्तान आणि दहशतवाद विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. तसेच आतंकवाद्याना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली.