श्रवणभक्ती [नवविधा भक्ती १]

साकारातून – निराकार किंवा सगुणतेकडून – निर्गुणतेकडे त्या कृतज्ञ इशशक्ती [invisible energy] प्रत जाण्यासाठी अनेक मार्ग सांगितले आहेत. फक्त त्यासाठी सकारात्मक मानसिकता, कठोर मनोनिग्रह प्रत्येकाकडे असणे अत्यंत गरजेचे असते. सारेच जण काही दाढी – जटा वाढवून, कमंडलू हाती धरून वा सर्व संग परित्याग करून म्हणजेच संन्याशी बनून जंगलाची वाट धरू शकत नाहीत. हे देखील तितकेच खरे आहे. पण गरीब, दीनदुबळ्या सामान्याचे काय? कारण समाजातील बहुतांशी वर्ग प्रापंचिक असतो. त्याने संसार धर्म स्वीकारलेला असतो. संन्यासाचा नित्याचा सारा आवश्यक गाडा [दुःखे, संकटे, समस्या, अडथळे, मानापमान इ.इ.] हाकत हाकत त्याचा सारा दिवसच जणू संपून जातो. तो अगदी थकून जातो. त्यासाठी साधा, सहजी, सोपा व सरळ सर्वांना करता येण्याजोगा मार्ग आपल्या पूर्वजांनी सांगितला आहे. त्या शक्तीप्रत पोहोचण्याजोगी एक अदृश्य शिडी वा सेतू आहे. त्यास योग देखील म्हणतात. [मूळ धातू युज = सांधणे / जोडणे. तो म्हणजे योग.] ती म्हणजे सहज करता येणारी भक्ती होय.

श्रवण भक्ती ही तर अत्यंत साधी सरळ प्रकाराची भक्ती आहे, कारण त्यामध्ये नुसते आपण श्रवणच  करायचे आहे, ते देखील एकट्याने वा समूहासोबत. व्यासपीठ, मोकळे मैदान धर्मसभा, मंदिर इ. ठिकाणी श्रोतृवृंद वर्ग मोठ्या प्रमाणात एकत्र जमलेला असतो. सगळ्यासमोर कीर्तनकार, वक्ता, प्रवचनकार. राष्ट्रीय नेता अभिनेता, संगीतकार, कलाकार गरजेनुसार आपापल्या साथीदारांसह हजर असतो. व आपापले पूर्व नियोजित कार्यक्रम संपन्न करीत असतो. आपल्या अंगी असलेल्या कलेच्या निपुणतेने, समर्थपणे श्रोत्यांना अगदी खिळवून ठेवतो. त्याच्या सादरीकरणात इतरांना सहभागी करून घेत असतो. हेच तर त्याचे कौशल्य असते. [अभिनय, संगीत, कथा-कीर्तन, भाषण, पोवाडे इ.इ.] त्यामध्ये श्रोता देखील त्यात तल्लीन होऊन जातो.

तल्लीनता – श्रवण करीत असताना मन तल्लीन होणे वा काही काळ आपले देह्भानच विसरून जाणे ही आध्यात्मिक / आरोग्य / मानसिकदृष्ट्या देखील अत्यंत महत्वाची असते. संत पुरुष वा योगी यांच्यादृष्ट्या ही समाधीवस्था फार मोठी असते. कारण त्या मानसिक स्थितीत काही काळ तरी स्वतः म्हणजे त्याला भेडसावणाऱ्या नित्य कटकटीना, दुःखांना, समस्यांना विसरलेला असतो. मग तो एखाद्या गाण्यांचे स्वर तो गुणगुणत असेल वा एखादा ताल वा ठेका मनी धरत असेल. वा एखादा आवडलेला नाटकातील उतारा अभिनायासकट म्हणत असेल किंवा संत चरित्रातील चमत्कारात गुंगत असेल. इ. इ. आणि तीच अंतर्मुखता, तीच तल्लीनता, तीच भावसमाधी, म्हणजेच तल्लीनता होय.

आपण एखादा ज्यावेळी [वैयक्तिक / सार्वजनिक कार्यक्रम ऐकतो, त्यावेळी वक्ता / कीर्तनकार / गायक इ. कुणीही असो, त्यांच्या मुखातून बाहेर आलेल्या ध्वनी लहरी श्रोतृ वृंदाच्या कर्ण पटलावर आपटतात. त्यामुळे झालेल्या ध्वनी कंपनामुळे अति शिघ्रतेने आपल्याला त्या आवाजाची जाणीव होते. ही नैसर्गिक प्रक्रिया शिघ्र होऊन समस्त श्रोत्यांकडून प्रतिक्रिया मिळून श्रोता भाव मुग्ध होतो. वारंवार ह्या भाव समाधीचा श्रोता / भक्तास प्रत्यय येऊ लागतो. हीच त्या निर्गुण / निराकार शक्ती प्रत जाण्यासाठी सहज / सुलभ असलेली श्रवण भक्ती होय.

– रामकृष्ण विनायक अभ्यंकर,

२/४६ भक्तियोग सोसा. परांजपे नगर,

वझिरा नाका बोरीवली प.

मुंबई ४०००९१

मोबा.९८१९८४४७१०