शिवसेना ठाकरे गटाकडून श्रीरामाची रथयात्रा, पालखी आणि दिंडी

ठाणे: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने रविवार २१ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीरामांचा रामरथ मिरवणूक, पालखी व दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

या दिंडीचा प्रारंभ वारकरी भवन, राम मारुती रोड, नौपाडा येथून होणार आहे. ही दिंडी श्री गजानन महाराज मंदिर, जुना मुंबई रस्ता मार्गे, घंटाळी रोड श्री साईबाबा मंदिर, घंटाळी देवी मंदिर, सामंत ब्लॉक्स, राम मारुती रोडमार्गे न्यू गर्ल्स, न्यू इंग्लिश स्कूल, पु.ना. गाडगीळ, राजवंत ज्वेलर्स, मासुंदा तलाव, मराठी ग्रंथ संग्रहालय बाजारपेठ रोड, श्री कोपनेश्वर मंदिर, श्री सिद्धिविनायक मंदिर, जांभळी नाका येथे समारोप होणार आहे.

शेकडो वर्षाच्या अथक प्रयत्नाने राम जन्म भूमी अयोध्या नगरीत श्री राम मंदिर उभारण्यात आले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आणि करोडो राम भक्तांची इच्छा प्रत्यक्षात साकारली जात आहे. अनेक साधुसंतांच्या उपस्थितीत श्रीराम मूर्ती प्रतिष्ठान सोहळा संपन्न होत आहे. तसेच शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने २२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून राम उत्सव, अभिषेक, भजन, कीर्तन वारकरी भवन, ठाणे येथे सुरू असणार आहे. या रामरथ मिरवणुकीमध्ये ठाणेकरांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे आवाहन खासदार राजन विचारे यांनी केले आहे.