ठाणे: दिव्यापाठोपाठ ठाणे पूर्व भागातील आनंदनगर येथे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटात राडा झाल्याची घटना काल रात्री घडली. या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपचे ठाणे शहर सचिव प्रमोद चव्हाण यांनी शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या विरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यावरून हा वाद उफाळून आला होता. शिवसेना पुरस्कृत साईनाथ मित्र मंडळाच्या कार्यालयाचा श्री. चव्हाण यांनी ताबा घेतला. तेथे भाजपचे कार्यालय सुरू करून त्यावर भाजपचा झेंडा देखील लावण्यात आला होता. हे कार्यालय खाली करून साईनाथ मित्र मंडळाला द्यावे, अशी मागणी या मंडळाचे संस्थापक आणि शिवसेना उपविभाग प्रमुख किरण गायकवाड संजय बच्छाव, शैलेश शेलार आणि इतर कार्यकर्ते करत होते. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यावरून या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपचा बोर्ड तसेच झेंडा काढून टाकला.
या घटनेची माहिती मिळताच शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के हे घटनास्थळी आले. वातावरण तंग झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच कोपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या समोरच पुन्हा एकदा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातून श्री. चव्हाण यांना बाहेर काढण्याची मागणी केली. कार्यकर्ते संतप्त झाले होते. श्री. चव्हाण यांना मारहाण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना पोलीस बंदोबस्तात पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तिथे श्री.चव्हाण यांच्यासह भाजपच्या एका कार्यकर्त्यावर शिवसेनेचे किरण गायकवाड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज मंडळाच्या कार्यकर्त्यांनी साईनाथ मंडळाचा फलक लावून त्या जागेत वाचनालय सुरू केले.