तानसा धरणाच्या पायथ्याशी भीषण पाणीटंचाई

शहापूर: शहापूर तालुक्यात तानसा, वैतरणा, भातसा यासारखी महाकाय धरणे असतांना इथल्या आदिवासींच्या पाचवीला पुजलेली पाणीटंचाई दूर होण्याचे नाव घेत नाही. दरवर्षी अनेक गावपाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

दरवर्षी अनेक शासकीय पाणी योजना कागदोपत्री नाचवून पाणीटंचाई दूर करणारे शासकीय अधिकारी आणि ठेकेदार लाखोंचा मलिदा लाटत आहेत. तरी देखील शहापूरची पाणीटंचाई जैसे थे आहे.

तालुक्यातील तानसा अभयारण्यालगत असलेल्या अघई ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या सावरदेव पाड्यातील आदिवासी बांधव पाणीटंचाईचा सामना करतांना दिसून येत आहेत. जवळपास ३४५ च्या वर आदिवासी बांधव वास्तव्य करत असलेल्या सावरदेव पाड्यापासून मुंबईची तहान भागवणारे तानसा धरण फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे. तरीही येथील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. धरण उशाला असतांनाही येथील आदिवासींच्या घशाची कोरड थांबायचे नाव घेत नाही.

सावरदेव सारखे डोळखांब, कसारा, अजनूप, अघई परिसरातील गावपाड्याना एप्रिल-मे महिन्यामध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून सध्या शहापूर पाणी पुरवठा विभागाकडून ४१ गावे आणि १५१ गावपाड्यांना ४२ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.