नगरसेवक संजय भोईर यांचा पुढाकार
ठाणे: बाळकूम भागातील सुशिक्षित अशा लोढा अमारा या गृहसंकुलातील नागरिकांनी कुत्र्याच्या उपद्रवातून सुटका करण्याची मागणी केली होती. त्यानुसार नवनिर्वाचित नगरसेवक संजय भोईर यांनी कुत्र्यांचा बंदोबस्त केल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.
लोढा अमारा या गृहसंकुलात सुमारे १५ ते १६ हजार नागरिक राहतात. त्यांना कुत्र्यांचा त्रास होत असतो. या भागातील काही श्वानप्रेमी नागरिक कुत्र्यांना खाण्यासाठी खाद्य पुरवत असतात. त्यामुळे या भागात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत असतानाच ठाणे महापालिकेच्या पशु वैद्यकीय विभागाने या भागात पाच ठिकाणी श्वानांना खाद्य देण्याचे निश्चित केल्यामुळे या भागातील नागरिक संतप्त झाले होते.
महापालिका निवडणुकीत देवराम भोईर, संजय भोईर, उषा भोईर रत्ना भोईर हे निवडून आल्यावर या भागातील नागरिकांनी कुत्र्यांना खाद्य घालण्याच्या पाच ठिकाणांना विरोध करून ह्या जागा रद्द कराव्यात, अशी मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन संजय भोईर, उषा भोईर आणि रत्ना भोईर तसेच लोढा अमारा या गृहसंकुलातील नागरिकांची अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी आणि पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. शमा शिरोडकर यांच्यात बैठक झाली. या बैठकीत खाद्य घालण्याच्या पाच ठिकाणांऐवजी पूर्वीच्या गणपती मंदिर येथिल एकच ठिकाणी कुत्र्यांना खाद्य पदार्थ देण्यास परवानगी देण्यात आली असून इतर चार ठिकाणी खाद्य पदार्थ देण्यास मनाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्याने तयार होणाऱ्या कमिटीच्या शिफारशीनुसार कुत्र्यांना खाद्य पदार्थ देण्याचा निर्णय घेण्यात येईल असे ठरले आहे.
या निर्णयाचे अमारा येथिल नागरिकांनी स्वागत केले असून अन्य ठिकाणी खाद्य पदार्थ टाकणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.