- * राहुल गांधींना महाराष्ट्रात पाऊल ठेऊ देणार नाही, भाजप आक्रमक
* ठाण्यात मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा
* काँग्रेसचा प्रतिइशारा
* ठाकरे गटाकडून भाजपला चिमटा
मुंबई: स्वा. वि. दा.सावरकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांना राज्यात पाऊल ठेऊ देणार नाही, असा इशारा भाजपने दिला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाण्यात एका कार्यक्रमात काँग्रेसला इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी महाराष्ट्रात येणार आहेत.त्यामुळे राजकीय वातावरण पेटण्याची चिन्हे आहेत. दरम्यान काँग्रेसनेही यावर प्रति इशारा देत त्यांचा मनसुबा स्पष्ट केला आहे. तर ठाकरे गटाने भाजपला चिमटा काढला आहे.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या भेटीलाही राहुल गांधी येणार असल्याचे पुढे आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींनी महाराष्ट्राची माफी मागावी मगच यावे, असा इशारा दिल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भाजपाला प्रतिइशारा दिला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जर भाजपावाले राहुल गांधींना आव्हान देत असतील तर राहुल गांधी आता महाराष्ट्रात येणार आहेत. जर धमक असेल तर त्यांच्या केसालाही धक्का लावून पाहा, ही महाराष्ट्राची परंपरा नाही. परंतु परंपरेला गालबोट लावायची हिंमत भाजपा करत असेल तर जशाला तसे उत्तर देण्याची भूमिका काँग्रेसची आहे, असे त्यांनी सांगितले.
पाच वेळा जाणीवपूर्वक राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला, महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधींनी वीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याची माफी मागावी अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तर राहुल गांधी मातोश्रीवर येतील यावर माझा विश्वास नाही. राहुल गांधी सत्ता नसताना ठाकरेंना भेटायला येतील असं वाटत नाही. मात्र यामागे काय राजकारण आहे ते शरद पवारच सांगू शकतील असा टोला भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.
वीर सावरकरांचे विचार वाचा, समजून घ्या आणि तुम्ही किती सावरकरांच्या विचारांचे पालन करता ते पाहा असे सांगत ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी बावनकुळेंच्या इशाऱ्यावर भाष्य केले.