शहापूर: वन विभागाच्या वतीने वैशाख पोर्णिमेला वन्यप्राण्यांची गणना केली जाते. या गणनेसाठी शहापूर वन विभाग सज्ज झाला आहे. तालुक्यातील अभयारण्यासह वनविभागाच्या विविध भागात ही प्राणी गणना केली जाणार आहे.
वनविभागाच्या वतीने दरवर्षी वैशाख पोर्णिमेला वन्यप्राण्यांची गणना केली जाते. त्यानुषंगाने तानसा- वैतरणा,शहापूर वनपरीक्षेत्र व धसई वनपरीक्षेत्र हद्दीत वन विभागाने मचाण तयार करुन ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.
प्रमुख पाणवठ्याच्या ठिकाणी वन विभागाच्या वतीने उंच ठिकाणी झाडांच्या बांध्यावर किंवा टेकडीवर झाडांच्या फांद्यांच्या सहाय्याने आडोसा निर्माण केला जातो. त्यामध्ये वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच काही पर्यावरण मित्र स्वयंसेवक म्हणून थांबतात. वैशाख पोर्णिमेला दिवसा आणि रात्री किती वन्यप्राणी पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी वेगवेगळ्या वर्गवारीतील किती प्राणी आले त्यांची गणना केली जाते.
मागील वर्षी मचाणावरून वन्य प्राण्यांचे निरीक्षण केले असता त्यात आठ प्रकारचे सस्तन प्राणी दिसून आले. यामध्ये भेकर, रानडुक्कर, उदमांजराच्या दोन प्रजाती, मुंगूस, ससा, तरस आणि संकटग्रस्त असा चौशिंगा दिसून आल्याची नोंद आहे.
दरम्यान अवकाळी पाऊस सोबतच ढगाळ वातावरण यामुळे पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात होणारी प्राणी गणनेवर विरजन पडण्याची शक्यता नाकरता येत नाही. तरीही शहापूर उपवनसंरक्षण विभाग प्राणी गणनेसाठी पूर्ण तयारीनीशी असल्याची माहिती धसई वनपरीक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकुर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
प्राणी गणनेसाठी बुद्ध पौर्णिमेची वेळ योग्य असते. या दिवसात वातावरणात वन्यप्राणी किमान एकदा तरी पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येतात. चंद्राचा लख्ख प्रकाश पडलेला असतो. त्यामुळे या दिवशी प्राणीगणना अचकू होते, असे वनपरीक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी यांनी सांगितले.
८३०० हेक्टर क्षेत्र असलेल्या तानसा-वैतरणा प्राणीगणनेसाठी चाळीसपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २० कृत्रीम पाणवठ्यासह सहा नैसर्गिक पाणवठ्याजवळ सहा मनोरे व झाडांना मचाण बांधून प्राणी निरीक्षणाची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती वन्यजीव वनपरीक्षेत्र अधिकारी, तानसा-वैतरणा प्रकाश चौधरी यांनी दिली.