सतीश प्रधान अनंतात विलीन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

ठाणे : ठाणे महापालिकेचे प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांच्यावर सोमवारी सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जवाहर बाग वैकुंठभूमीत शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

ठाणे शहराच्या विकासात तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत सतीश प्रधान यांनी मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निधनामुळे सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ठाणे शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकिय जडणघडणीमध्ये योगदान देणारे सतिश प्रधान गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यामुळे सक्रिय राजकारणापासून ते अलिप्त होते. रविवारी, दुपारी ठाण्याच्या खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता सतीश प्रधान यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ज्ञानसाधना महाविद्यालय येथे ठेवण्यात आले होते. यावेळी सर्वपक्षीय नेते मंडळींनी सतीश प्रधान यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, वनमंत्री गणेश नाईक, खासदार नरेश म्हस्के, आ. रविंद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, उबाठा गटाचे माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, नरेश मणेरा, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणेवैभव’चे संपादक मिलिन्द बल्लाळ, सरस्वती इंग्रजी माध्यम शाळेच्या संचालिका मीरा कोर्डे, सरस्वती शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा बल्लाळ यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी, ज्ञानसाधना महाविद्यालयातील शिक्षक वृंद, कार्यकर्ते आणि नागरिकांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.

सतिश प्रधान यांच्यावर आज ठाण्याच्या जवाहर बाग स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

ठाणे शहराच्या जडणघडणीमध्ये श्री. प्रधान यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम केले होते. ते बाळासाहेबांचे विश्वासू सहकारी होते. राममंदिर कारसेवक म्हणून त्यांनी काम केले होते. एक क्रीडाप्रेमी नेता तसेच शहर विकासाचा ध्यास घेतलेला नेता हरपला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.

माजी खासदार सतीशचंद्र प्रधान यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन भाजपचे प्रदेश प्रभारी व आमदार रवींद्र चव्हाण यांनी श्रद्धांजली वाहिली. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात त्यांचे कार्य अभिमानास्पद होते, अशी भावना व्यक्त केली. यावेळी भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचीही उपस्थिती होती.