जांभळी नाक्यावरील दोन्ही मंडयांनी बेमुदत बंद पुकारल्याने बाहेर बसणाऱ्या फळ-भाजी विक्रेत्यांनी चढ्या दराने विक्री करण्यास सुरुवात केली आहे. ऐन महागाईत या बंदचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
विविध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने जांभळी नाका परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांचे चांगलेच बस्तान बसले आहे. यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असून येथील जिजामाता फळ-भाजी सेवा संघ आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान भाजी विक्रेता संघ या मंडयांमधील अधिकृत विक्रेत्यांवर उपासमार ओढवली असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी या दोन्ही मंडयांनी बेमुदत बंद पुकारला आहे. या बंदचा गैर फायदा घेत मंडयांबाहेरील विक्रेत्यांनी घेतला असून चढ्या दराने फळ आणि भाज्यांची विक्री सुरू केली आहे.
मी गेल्या २५ वर्षांपासून तलावपाळी येथील घाऊक आणि किरकोळ भाज्या दररोज खरेदी करत आली आहे. ठाणे बंद, कोरोना काळांतही भाज्यांचे दर वाढले नाहीत, परंतु, येथील भाजी विक्रेत्यांनी पुकारलेल्या ‘बंद’मुळे तलावपाळी किंवा कौपीनेश्वर मार्गावर दररोज बसणा-या विक्रेत्यांनी पाव किंवा अर्धा किलोमागे ३० ते ५० रुपये तसेच लिंबू , आले, कढीपत्ता यामागेही पाच ते आठ रुपये वाढवले आहेत. आधीच महागाई वाढली असताना भाज्यांच्या किंमती वाढवणे अयोग्य आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया खारकर आळीत राहणा-या स्वाती बाचल यांनी व्यक्त केली.
दोन मोठ्या मंडया बंद असल्याने तलावपाळीभोवती किंवा कौपिनेश्वर मंदिराच्या रस्त्यावर भाजी वाट्टेल त्या दराने विकल्या जात असल्याचे दृष्य दुपारी १२ वाजताही दिसले. विक्रेत्यांची फार गर्दी नसली तरी, ते ग्राहकांना नाडून त्यांची तुंबडी भरत होते. प्रत्येक भाजीमागे अतिरिक्त ३० ते ५० रुपयांची मागणी होत होती. नेहमीची फळेही महाग झाली होती. येथे आलेल्या ग्राहकांना वधारलेले दर ऐकून अनेकांनी काढता पाय घेतला.
१९ एप्रिल रोजी महापालिकेवर मोर्चा
जिजामाता फळभाजी सेवा संघ, ठाणेतर्फे १९ एप्रिल २३ रोजी ठाणे महापालिका मुख्यालयावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सेवा संघाचे सचिव सुभाष ठोंबरे यांनी ‘ठाणेवैभव’ला दिली.