मुंबई विद्यापीठ उपकेंद्रात विद्यार्थिनींची सुरक्षितता वाऱ्यावर

उपकेंद्र संचालकांवर कारवाई करा-अभाविप

ठाणे : मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राच्या परिसरात विद्यापीठाचे विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थिनींना अनेक दिवस बलात्काराच्या धमक्या तसेच अश्लील मजकूर असलेली पत्रे त्यांच्या वर्ग खोलीत व बॅगेत आढळून येत होती. याबाबत तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे.

५ डिसेंबर रोजी या सर्व प्रकाराबाबत संबंधित विद्यार्थिनींनी ठाणे उपकेंद्राचे प्रमुख यांच्याकडे तक्रार केली असता केंद्र प्रमुख लेखी तक्रार घ्यायला तयार नव्हते. याबाबत विद्यार्थिनींचे पालक उपकेंद्राच्या प्रमुखांना जाऊन भेटले तसेच त्यांनी स्थानिक पोलीस स्थानकात फक्त जबाब नोंदवण्यात आला. यावेळी देखील उपकेंद्र प्रमुख अथवा कोणी प्राध्यापक विद्यार्थीनी सोबत उपस्थित नव्हते.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस व विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करणे अपेक्षित होते. याउलट उपकेंद्र प्रमुख विद्यार्थिनींवर दबाव टाकत असून सदर प्रकरण मिटवू पाहत आहेत. यामुळे उपकेंद्राच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशी तक्रार अभाविप ठाणे शाखेकडे केली गेली आहे.

या घटनेला सात दिवस होऊन गेले असता यावर ठोस कारवाई केल्याचे दिसून येत नाही. मुंबई विद्यापीठासारख्या ठिकाणी अशा पद्धतीचे घृणास्पद व निंदनीय प्रकार घडतात ही गोष्ट अतिशय लज्जास्पद आहे. विद्यापीठाच्या लेखी विद्यार्थ्यांना किती किंमत आहे हे यातून दिसून येते. यामध्ये काही पालक विद्यार्थिनींचे प्रवेश रद्द करत असून यामुळे विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. काल १२ डिसेंबरपर्यंत विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील या प्रकाराबाबत कुठलीही माहिती नव्हती. अभाविपने कुलगुरुंची भेट घेत त्यांना हा सर्व प्रकार लक्षात आणून दिला. त्यावेळी त्यांनी यावर चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन दिले आहे. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थीनींमध्ये भीतीचे वातावरण असून विद्यापीठाने सर्व विद्यार्थिनींना विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे परिषदेने म्हटले आहे.

या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन याची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी. तसेच कारवाई न करणाऱ्या उपकेंद्र संचालकांवर योग्य पद्धतीने कारवाई व्हावी, अशी मागणी अभाविप प्रदेशमंत्री संकल्प फळदेसाई यांनी व्यक्त केले.