कल्याण : चार वर्षापूर्वी पगारवाढ रोखल्याच्या रागातून आरपीएफ जवानाने आरपीएफ इन्स्पेक्टर बसवराज गर्ग यांची हत्या केल्याची घटना काल रात्री कल्याण रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या वसाहतीत घडली आहे.
हत्या करणारा आरपीएफ जवान पंकज यादव याला कोळसेवाडी पोलिसांनी पेण येथून पहाटे तीन वाजता अटक केली आहे. त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसरावराज गर्ग हे आरपीएफच्या सब इन्स्पेक्टर पदावर कार्यरत होते. ते कल्याण रेल्वे स्थानकालगत असलेल्या कल्याण पूर्व भागात रेल्वे वसाहतीत राहत होते. काल रात्री ते राहत असलेल्या बॅरेकमध्ये मोबाईलवर गाणी ऐकत बसले होते. त्याचवेळी अचानक आरपीएफ जवान पंकज यादव त्याठिकाणी आला. त्याने हातातील लाकडी दांडक्याने आणि ठोशा बुक्क्यांनी बसवराज यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत बसवराज यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. बसवराज यांची हत्या करुन आरोपी पंकज घटनास्थळावरुन पसार झाला.
आरोपी पंकज हा चिपळूणच्या दिशेने गेला असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांना मिळातच सहाय्यक पोलीस निरिक्षक हरीदास बोचरे यांच्या पथकाने चिपळूनच्या दिशेने आरोपीचा माग काढला. मात्र आरोपी हा चिपळूणला गेला नसून तो पेणला गेला असल्याचे कळताच पोलिसांनी त्याच्या शोधात पेणच्या दिशेने मोर्चा वळविला. पहाटे तीन वाजता पेण येथून आरोपी पंकजला पोलिसांनी अटक केले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.