ठाण्यात बक्षिसांची रिघ; दुसरीकडे कचऱ्याचे ढीग!

‘अभियान’ कोमात; ‘योजना’ जोरात

ठाणे : स्वच्छ आणि सुंदर शहर, प्रदूषण आणि पर्यावरण अशा विविध स्पर्धेत ठाणे महापालिका मागील काही वर्षांत बक्षिसांची लयलूट करीत असताना दुसरीकडे मात्र ठाण्यात सर्वंकष स्वच्छता अभियानाला गेल्या चार महिन्यांपासून ब्रेक लागल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. राज्याच्या योजना राबवताना या अभियानाकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाण्यात डीप क्लिनिंगची मोहिम सुरू करण्यात आली. ठाणे महापालिकेतील प्रत्येक प्रभागात दर शनिवारी ही मोहिम राबवली गेली. सुरुवातीला स्क्रबर फूटपाथ कर्ब स्टोन, डिव्हायडर साफ करण्यात आले. त्यातून पडणारी माती, धूर गोळा करून त्यानंतर हाय प्रेशर पंपाने फूटपाथ, भिंती धुतल्या गेल्या. मंदिरांचीही स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेमुळे संपूर्ण शहर पुन्हा उजळून निघाले. त्यामुळे ही मोहिम निरंतर सुरू ठेवण्याची ग्वाही तत्कालीन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

अभिजित बांगर नंतर पालिका आयुक्तपदी रुजू झालेल्या सौरभ राव यांनीही सुरुवातीच्या कालावधीत ही मोहिम धडाक्यात पुढे नेण्याचा प्रयत्न केला. भाजी मंडई परिसर, जांभळीनाका, स्थानक मार्ग, तलावपाळी परिसर स्वच्छतेवर भर दिला. केवळ परिसरच नव्हे तर शौचालय आणि नालेसफाईवरही त्यांनी भर दिला. पण एप्रिलनंतर ही मोहिम पुढे सरकलीच नसल्याचे उघडकीस आले आहे.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणाची जबाबदारी आल्याने आधी पालिका अधिकार्‍यांसह कर्मचारी त्यात गुंतले. त्यानंतर एकामागून एक सरकारी योजनांच्या पुर्ततेसाठी यंत्रणा कामाला लागली. मुख्यमंत्र्यांची महत्वाकांक्षी लाडकी बहिण योजना यशस्वी करण्याची धुराही पालिका अधिकारी, कर्मचार्‍यांनी पार पाडली. या सर्व कामांच्या व्यग्रतेत डिप क्लिनिंगचा विसर पडला.

पालिका अधिकार्‍यांकडे याबाबत विचारणा केली असता सुरुवातीला पावसाळ्याचे उदाहरण देण्यात आले. रोज रस्ते, उद्यान, परिसर स्वच्छ केला जात आहे. मात्र तरीही दाटीवाटीच्या परिसरांमध्ये कचर्‍याचे ढिग साचल्याचे दिसत आहे.

तीन दिवसांपूर्वी ठाण्यात मुख्यमंत्र्यांना कचर्‍याचे ढिग निदर्शनास आले. मुख्यमंत्री संतापल्यानंतर पालिका आयुक्त सौरभ राव यांनी तत्काळ संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली आणि अधिकार्‍यांना कडक समज दिली. त्यावेळी स्वच्छतेवर पुन्हा जोर दिल्याचे दिसून आले, स्वच्छता निरिक्षकांची गस्तही वाढली असून कामचुकारपणा करणार्‍या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाईला सुरुवातही झाली आहे, पण आजही अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत असल्याने संबंधीत यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.