आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली पाहणी
ठाणे: पारसिक-मुंब्रा येथे रेतीबंदर चौपाटीचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुढील दोन ते तीन महिन्यांत या चौपाटीचे काम पूर्णत्वास येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्घाटन करतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आ.जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
सोमवारी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी पारसिक चौपाटीची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, सन २००९ साली आपण या भागात चौपाटी उभारण्याचे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या होत्या. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी ही चौपाटी उभी करण्यासाठी येथील अतिक्रमणे हटविली होती. त्यामुळे येथील भूमाफियांनी 25 कोटी रुपये खर्च करून डाॅ. अश्विनी जोशी यांची बदली केली. त्यानंतर ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी आलेल्या संजीव जैस्वाल यांना घेऊन आपण दोन दौरे केले आणि चौपाटीचे काम मार्गी लावले. रेतीबंदर खाडीकिनारी चार किमी लांबीच्या 42 एकर जागेवर सिंगापूर आणि साबरमतीच्या धर्तीवर चौपाटी उभारण्यात येत आहे. खाडीवर चालण्यासाठी देशातील पहिला तरंगता मार्ग, थीम पार्क, अॅम्फी थिएटर, बोटींग, क्रीडा व मनोरंजनाची अद्ययावत साधने यासह जवळपास 18 अत्याधुनिक सुविधा रेतीबंदर चौपाटीवर उभ्या केल्या जात आहेत, असे डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या चौपाटीचे उदघाटन होईल, असे सांगतानाच आव्हाड यांनी मी कोणत्याही कामाचे श्रेय घेत नाही, हे देखील स्पष्ट केले.
माझ्या मतदारसंघासाठी यापूर्वी कधीही निधीची कमतरता भासत नव्हती. आपण प्रस्ताव मांडला की, एकनाथ शिंदे हे लगेच निधी देत होते. सन २०१७ ते २०२१ दरम्यान एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कधीही आपला विकासनिधी थांबविला नाही. पूर्वी ठाण्यात निधीचे राजकारण कधीच झाले नव्हते. ते आता सुरू झाले आहे, अशी टीकाही आव्हाड यांनी यावेळी केली.
या पाहणीप्रसंगी सुहास देसाई, प्रकाश पाटील, मिलींद पाटील, प्रमिला केणी, शानू पठाण, सुजाता घाग, विक्रम खामकर, शमीम खान आदी वरिष्ठ पदाधिकारी तसेच सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.