धोकादायक-बेकायदेशीर होर्डींगमुळे रहिवाशांचा जीव टांगणीला

घाटकोपर येथील होर्डिग दुर्घटनेत १६हून अधिक बळी गेल्यानंतरही ठाणे महापालिका प्रशासनाचे डोळे उघडलेले दिसत नाहीत. ठाण्यातील माजिवडा उड्डाणपुला नजीकच्या सोसायटीच्या जागेत परवानगीविना उभारलेल्या होर्डिंगची टांगती तलवार कायम असल्याने रहिवाशी धास्तावले आहेत.

ठाण्यातील माजिवडा उड्डाणपुलानजीकच्या सेवा रस्त्यावर आनंद कवच को. ऑप. हाऊसिंग सोसायटी आहे. या सोसायटीच्या जागेत ठाणे महापालिकेकडे खोटी कागदपत्रे सादर करून २०१८ साली ८० फुट x १०० फुट व ९० ते ९५ फुटांपेक्षा उंच असे दोन जाहीरात फलक एका जाहिरात ठेकेदाराने उभारले आहेत. या अनधिकृत होर्डिगबाबत सोसायटीने स्थानिक नगरसेवक, प्रशासन तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या. होर्डींगबाबत मुख्यमंत्र्याचे स्पष्ट निर्देश असताना देखील महापालिका अधिकाऱ्यांच्या पक्षपाती धोरणामुळे रहिवाशी आणि पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या जाहीरात फलकाला लागून अनेक घरे असून रहिवाशांची वहीवाट बंद झाल्यामुळे हे बेकायदा होर्डिग हटविण्यासाठी सोसायटीचा अविरत लढा सुरू आहे. परंतु, ठामपाचे अधिकारी काहीच दखल घेत नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.