विदेशी जातीच्या श्वानांसह अश्वाची सुटका

ठाणे: स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे डांबून ठेवलेल्या बारा श्वानांची प्राणी मित्रांनी सुटका केल्याची घटना पूर्व ठाण्यात घडली आहे.

पूर्व ठाण्यातील स्मशान भूमीच्या बाजूला बारा श्वान आणि एक घोडा बेकायदेशीरपणे बांधून ठेवला असल्याची माहिती कळोते ऍनिमल ट्रस्टचे प्राणीमित्र सुशांक तोमर यांना समजली होती. त्यांनी कोपरी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी हे श्वान बांधून ठेवलेल्या जागेवर छापा मारला असता अतिशय हलाखीच्या स्थितीमध्ये हे प्राणी बांधून ठेवलेले आढळले. त्यांना पाणी, अन्न, निवारा अशा कोणत्याही सुविधा नव्हत्या. काळोखात उघड्यावर पावसात त्यांना बांधून ठेवण्यात आले होते. त्यामध्ये लॅब्राडोर, रोटविलेर, शिस तुझ, इंडि, आणि बेल्जियम शेफर्ड या श्वानांचा समावेश होता. त्या ठिकाणी एक घोडा देखिल बांधून ठेवला होता. त्याची मात्र सुटका करता आली नाही. या प्राण्यांची कुठेही नोंद ठेवण्यात आली नव्हती. याबाबत प्राणीमित्र तोमर यांनी पाळीव प्राणी कल्याण अधिकारी यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार करून श्वानांना बेकायदेशीरपणे डांबून ठेवणाऱ्या आरोपीच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.