सावरशेत गावचा पुनर्वसन प्रस्ताव धुळखात

पावसाळ्यात पुराची टांगती तलवार कायम

शहापूर: भातसा धरणाच्या खालील बाजूला असलेल्या सावरशेत गावातील अनेक घरात दरवर्षी पावसाचे व धरणाचे पाणी शिरत असल्याने येथील जनजीवन विस्कळीत होत असते. धरणातून सोडलेल्या पाण्याचा प्रवाह फार जोरात असल्याने येथे दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे पूर्ण गाव पाण्याने वेढले जात असल्याने काही घरे वाहून जाऊन जीवितहानी होण्याची शक्यता असते. पर्यायाने सावरशेत गावाचा संपर्क पावसाळ्यात तुटला जातो. येथील काही रहिवासी आपला जीव वाचविण्यासाठी इतरत्र आसरा घेत असतात.
2019 ऑगस्टच्या महिन्यात गावाला पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने पुराच्या पाण्याने हे गाव वेढले होते. त्यावेळी तत्कालीन आमदार पांडुरंग बरोरा यांच्या समवेत तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व अधिकाऱ्याना येथील पुनर्वसन करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. परंतु साडेतीन वर्ष झाले तरी याबाबत कोणतीच हालचाल होत नसल्याने सावरशेतचा प्रस्ताव लालफीतीत अडकला असल्याने पावसाळ्यात नदीला पूर येऊन गावात पाणी शिरते की काय या भितीने गावकरी धास्तावलेले आहेत.
तत्कालीन भेटीनंतर पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित केलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सावरशेत गावक-यांची पुनर्वसनाची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणली होती. त्यानंतर पाटबंधारे खात्याने या गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव सुद्धा दाखल केला असल्याचे सांगितले होते.मात्र साडेतीन वर्ष उलटून गेले तरी कार्यवाही होत नसल्याने सावरशेत गावाचा पुनर्वसनाचा प्रस्ताव धूळखात पडला असून यावर्षीही सावरशेत गाव पुरात अडकण्याची भीती स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करीत असून शासनाविरोधात संताप व्यक्त करीत आहे.
2016 पासून सावरशेत गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी जलसंधारण व महसूल विभागाकडे येथील रहिवाशांनी केली होती, परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थकरीत आहेत.सावरशेत गावात 55 घरे असून अंदाजे 350 लोकसंख्या आहे.धरणाच्या खाली गाव असल्याने धरणातुन पाण्याचा विसर्ग झाल्यावर पूर्ण गाव पाण्यात जाते. त्यामुळे या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटून जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने येथील रहिवाशी पावसाळ्यात जीव मुठीत धरून रहात असतात किंवा काही इतरत्र नातेवाईकांकडे रहायला जात असतात.
गेल्या साडेतीन वर्षापासून सावरशेत गावाचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव रखडल्याने आम्हाला पावसाळ्यात पाणी कधी वाढेल व कधी पूर येईल अशी टांगती तलवार असल्याने जीव मुठीत धरून जगावे लागत आहे त्यामुळे शासनाने आमच्या गावांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ कुमार भोईर यांनी केली.
गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर असून पाठपुरावा सुरु असल्याची माहिती भातसा धरण उपकार्यकारी अभियंता रविंद्र पवार यांनी दिली.