मीरा-भाईंदर महापालिका द्वितीय स्थानी
भाईंदर: महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास दिनानिमित्त मीरा-भाईंदर महानगरपालिका मालमत्ता कर विभागाने विक्रमी 89 टक्के कर वसुली केल्याने आणि उत्पन्न वाढीबरोबरच आस्थापना खर्चात बचत केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारला. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे व उपायुक्त रवि पवार उपस्थित होते.
31 मार्च 2023 रोजी मध्यरात्रीपर्यंत मीरा-भाईंदर महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत 182 कोटींची विक्रमी करवसुली करण्यात आली. याचे श्रेय आयुक्त दिलीप ढोले यांनी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (कर विभाग) संजय शिंदे, नियंत्रण अधिकारी, सहाय्यक नियंत्रण अधिकारी, मालमत्ता कर विभागप्रमुख, सर्व कर निरीक्षक, कर वसुली लिपिक व कर्मचारी यांना दिले आहे. त्याचबरोबर निर्देशानुसार कर वसुली करण्यासाठी नेमण्यात आलेल्या नियंत्रण अधिकारी व सहाय्यक नियंत्रण अधिकारी यांचे आयुक्त यांनी विशेष कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.
ऑनलाईन पद्धतीवर विशेष भर देत एक लाख 25,697 नागरिकांनी एकूण 66 कोटी 27 लाख 3419 इतका कर भरणा केला आहे. तर रोख रक्कमद्वारे 92,898 नागरिकांनी कर भरणा करून 37 कोटी 68 लाख 37,465 आणि धनादेशद्वारे (चेक) 91,560 नागरिकांनी कर भरणा करून एकूण 75 कोटी 21 लाख 27,625 इतका मालमत्ता कर भरणा केलेला आहे. महानगरपालिकेच्या कोषागारामध्ये एकूण मालमत्ता कर 181 कोटी 52 लाख 92 हजार 260 इतका जमा करण्यात आला आहे.