वाचनामुळे खुलते ज्ञानाचे दार – कुमार केतकर

ठाणे : वाचनामुळे ज्ञानाचे क्षितिज विस्तारित होते. वाचनातून ज्ञान वर्धन आणि संवर्धन होते. रोजच्या व्यवहारात आवश्यक ज्ञानभाषा शिकण्यासाठी या विषयीच्या पुस्तकांची मदत उपयुक्त ठरते. अशा शैक्षणिक पुस्तकांच्या वाचनामुळे ज्ञानाचे दार खुलते, असे उद्गार माजी पत्रकार आणि संपादक कुमार केतकर यांनी काढले.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेबद्दल आत्मविश्वास निर्माण करणारे प्रा. प्रज्ञा पंडित यांचे “इंग्रजी माझ्या खिशात” हे पुस्तक आज पन्नासाव्या आवृत्तीचे अनौपचारिक प्रकाशन कुमार केतकर यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी नुकतेच करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या पुस्तकाच्या एक लाखापेक्षा अधिक प्रतींचे वितरण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अनेक मराठी माध्यम शाळेत करण्यात आले आहे.
वितरक अनिल आयरे यांनी ही जबाबदारी पार पाडली. या पुस्तकाची पन्नासावी आवृत्ती यावेळी प्रकाशित करण्यात आली.

शारदा प्रकाशनाने ‘गाव तिथे पुस्तके’ हे मिशन हाती घेतले आहे, ज्याद्वारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांपर्यंत इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी उपयुक्त असणारे हे पुस्तक पोहोचवले जात आहे. ठाण्यातील ज्येष्ठ समाजसेवक अनुश्री भिडे आणि आनंद भिडे या दाम्पत्याने या सामाजिक कार्यासाठी मोलाचं हातभार लावला आहे.

साध्या, सोप्या पद्धतीने इंग्रजी संवाद कौशल्य शिकवणारे हे पुस्तक मराठी शाळा, सरकारी संस्था आणि आश्रमांतील विद्यार्थ्यांसाठी प्रभावी ठरले आहे. या प्रकाशन प्रसंगी लेखिका साधना केतकर, लेखिका नंदिनी बोपर्डीकर, तेजस्वी फाऊंडेशनचे संस्थापक दिग्दर्शक मनिष पंडित, शारदा प्रकाशनचे डॉ. संतोष राणे उपस्थित होते.

प्रा. प्रज्ञा पंडित यांची आतापर्यंत एकोणीस पुस्तके प्रकाशित झाली असून, त्या सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. “इंग्रजी माझ्या खिशात” हे पुस्तक महाराष्ट्रातील शाळा, अनाथाश्रम व अन्य संस्थांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे. यासाठी सहकार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी प्रा. प्रज्ञा पंडित यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.