रेमंड रिअल्टी करणार लिफ्ट कंपनीवर कारवाई

ठाणे: ठाण्यातील रेमंड टेन एक्स हॅबीटॅट गृहसंकुलात मंगळवारी संध्याकाळी तांत्रिक बिघाडामुळे एक लिफ्ट अपघात घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रेमंड व्यवस्थापनाने रहिवाशांकडे दिलगिरी व्यक्त करून ठेकेदारावर सक्त कारवाई करण्याची पोलिसांना विनंती केली आहे.

वर्तकनगर परिसरात वसलेल्या रेमंडच्या गृह संकुलतील टॉवर ए विस्ता या 42 मजली इमारतीतील लिफ्ट झटका लागून बंद पडण्याचा प्रकार सायंकाळी 5-30 वाजता झाला. यावेळेस लिफ्टमध्ये चार रहिवासी होते. त्यात एका लहान मुलाचा देखील समावेश होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि इजाही झाली नाही. अडकलेल्या चौघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

रेमंड रिअल्टीने आपल्या सर्व लिफ्ट्सचे काम एका आंतरराष्ट्रीय थायसेन कृप एलीव्हेटर या कंपनीला दिले असून त्यांच्याकडे देखभालीचे कंत्राट देखील दिले आहे,असे रेमंडचे फेसेलिटी मॅनेजर नितीन ढमाले यांनी ‘ठाणेवैभव’शी बोलताना सांगितले. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे आणि आम्ही रहिवाशाना झालेल्या त्रासामुळे त्यांची दिलगिरी व्यक्त करतो.

रेमंड रिअल्टीने याची गंभीर दखल घेतली पाहिजे. ठेकेदारावर योग्य कारवाई करून आम्हाला सुरक्षित लिफ्ट उपकरणे देण्याची हमी त्यांनी दिली पाहिजे, असे एका रहिवाशाने ‘ठाणेवैभव’शी बोलताना सांगितले. या संदर्भात वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदीवली आहे.

रेमंड एक जुनी नावाजलेली संस्था आहे. गेले 100 वर्षांपासून ती आपल्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. 2019 मध्ये ते बांधकाम क्षेत्रात शिरले आणि या क्षेत्रात देखील सर्व तज्ञ कंत्राटदारांशी संलग्न होऊन ती गुणवत्ता राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.

लिफ्ट लावणाऱ्या व मेंटेनेंस करणाऱ्या थायसन कृप कंपनीवर कारवाई करून भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून काळजी घेऊ असे रेमंड रिअल्टीचे प्रतिनिधी प्रशांत राठोड यांनी सांगितले.