रश्मी ठाकरे सक्रीय राजकारणात उतरणार?

मुंबई: राज्यात निवडणुकीचे वारे वेगाने वाहत आहे. त्यात शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या हातून पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही निसटले आहे, त्यामुळे ठाकरे गट सर्वच पातळीवर विरोधकांवर प्रहार करण्याची रणनीती आखत आहे. त्यात प्रामुख्याने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे राज्यभरात दौरे करत आहेत. पक्षाच्या शाखांना भेटी देत आहेत. त्यातच आता रश्मी ठाकरे यांनीही ठाकरे गटाची महिला आघाडी मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

अलीकडच्या काळात ठाकरे गटातून नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे यांच्यासारखे प्रमुख चेहरे एकनाथ शिंदेंसोबत गेले. त्यामुळे महिला आघाडीची ताकद काहीशी कमी झाली. मात्र नवीन नेतृत्वासोबत ठाकरे गटाची महिला आघाडी भरारी घेण्याच्या तयारीत आहेत.

याबाबत ठाकरे गटाच्या उपनेत्या संजना घाडी म्हणाल्या की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात उद्धव ठाकरे गटानेही महिला मतदारांची ताकद पाहून स्त्री शक्ती संवाद मोहिम हाती घेतली आहे. महाराष्ट्रातील २३ लोकसभा मतदारसंघातील महिला पदाधिकारी आणि महिला शिवसैनिकांशी चर्चा केली जाणार आहे. गद्दारी आणि गटतटाच्या राजकारणाची झळ पक्षाला कितपत पोहचली आहे. त्यात नव्या दमाने येणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना जबाबदारी दिली  जाणार आहे. अंगणवाडी सेविका, महिला बचत गट यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा साधली जाणार आहे. जेणेकरून महिला पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन करणार आहेत. महिला आघाडीच्या याआधीच्या कार्यक्रमात रश्मी ठाकरेंचे मार्गदर्शन होते. परंतु रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात स्त्री संवाद यात्रा राज्यभरात आणि मुंबईतल्या शाखाशाखांमध्ये घेणार आहेत. रश्मी ठाकरे या सर्व मोहिमेवर लक्ष ठेवून असणार आहेत हे आर्वजून संजना घाडी यांनी नमूद केले. त्यामुळे रश्मी ठाकरे आगामी काळात सक्रीय राजकारणात उतरणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

दरम्यान, १६ जानेवारी ते २० जानेवारी हा विदर्भात दौरा होईल. गडचिरोली ते विदर्भातील सर्व जिल्ह्यात आम्ही महिला पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा दौरा राज्यभरात होईल. शिवसेनेच्या उपनेत्या विशाखा राऊत, ज्योती ठाकरे, संजना घाडी, किशोरी पेडणेकर, शीतल देवरुखकर अशा वेगवेगळ्या गटाने हा दौरा होईल, अशी माहिती रंजना नेवाळकर यांनी दिली.