रानविहीरकरांना जानेवारीतच लागल्या पाणी टंचाईच्या झळा

पाण्यासाठी दोन किमीची पायपीट

शहापूर: शहापूर तालुक्यातील रानविहीर ग्रामपंचायतमधील ग्रामस्थांना ऐन जानेवारीत महिन्यात पाणीटंचाई जाणवू लागली असून पाण्यासाठी दोन किमी पायपीट करावी लागत आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून येथे बहुसंख्य आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या शहापूर तालुक्यातील डोळखांब विभागात नववर्षाच्या आरंभीच पाणीटंचाईच्या झळा जाणवत असल्याने येथील भगिनींना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

डोंगर पठाराच्या उतारावर असलेल्या रानविहीर ग्रामपंचायतीत कुणबी, कातकरी म.ठाकूर समाजाचे नागरिक वास्तव्यास असून 113 कुटुंबे असून जवळपास 462 च्या आसपास लोकसंख्या आहे. येथील महिला भगिनींना जानेवारीतच पाण्यासाठी दोन-दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. येथे असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक पाणी योजना, इंधन विहिरी, पाणी स्रोत कोरडेठाक पडल्याने येथील ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा पोहचत आहेत. जिल्हा परिषदेच्या टंचाई आराखड्यामध्ये दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करून देखील शहापूरकरांची तहान काही भागत नाही.

तानसा, वैतरणा, मध्यवैतरणा व भातसा यासारखी महाकाय धरणे असतानाही शहापूर तालुक्याच्या घशाला पडलेली कोरड कधी संपणार हा देखील मोठा यक्ष प्रश्न आहे. याबाबत रानविहीर ग्रामपंचायतीचे सदस्य ललिता दुटे, मनिषा डोहळे, एकनाथ भगत, सुमन लाखे यांनी प्रसिद्धी माध्यमांकडे आपली कैफियत मांडली आहे.