राज ठाकरेंना पुढचे दोन-तीन महिने आराम

कोणतीही सभा, भाषण किंवा मीटिंग घेता येणार नाही

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून पुढचे दोन ते तीन महिने त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. या दरम्यान राज ठाकरे यांना कोणतीही सभा, भाषण किंवा मीटिंग घेता येणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. राज ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉ. जलील पारकर आणि डॉ विनोद अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.

डॉक्टरांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, राज ठाकरे यांच्यावर आज हिप बोनची दीड तास शस्त्रक्रिया चालली. ऑपरेशन दरम्यान त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. आता 4 ते 5 दिवस त्यांना रुग्णालयात उपचार करून मग त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. रुग्णालयात उद्यापासून त्यांना फिजिओथेरपी दिली जाईल. नंतर त्यांच्यावर घरीसुद्धा फिजिओथेरपी आणि उपचार करण्यात येईल. पुढचे दोन ते तीन महिने त्यांना आरामच करावा लागेल.

डॉक्टरांनी पुढे सांगितलं की, राज ठाकरे जोपर्यंत दोन्ही पायावर उभे राहू शकत नाहीत तोपर्यंत त्यांना कुठलीही सभा, भाषण  किंवा मीटिंग घेता येणार नाही. आता त्यांना पुढचे काही दिवस सपोर्ट घेऊनच चालावं लागेल. दोन तीन महिन्यानंतर ते चांगले होतील. सर्वात महत्वाचा म्हणजे राज ठाकरे यांच्या चाहत्यांनी काळजी करण्याची गरज नाही.
शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच्या चाचण्या करण्यासाठी राज ठाकरे यांना शनिवारी (18 जून) मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. अखेर आज त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

मध्यंतरीच्या काळात टेनिस खेळताना राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. हीच दुखापत पुन्हा एकदा बळावली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार आज लिलावती रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली.

राज ठाकरे मे महिन्यात पुणे दौऱ्यावर होते. हे दुखणं वाढल्यामुळे त्यांनी पुणे दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतले. यानंतर राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केल्याचं जाहीर केलं. येत्या 5 जून रोजी राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह अयोध्या दौऱ्याला जाणार होते. त्यासाठी जय्यत तयारीही करण्यात आली. परंतु पायाचं दुखणं अधिकच वाढल्याने डॉक्टरांनी शस्त्रकियेचा सल्ला दिला. परिणामी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं.

हिप बोन म्हणजे कमरेच्या हाडांना होणारा त्रास. विशेष म्हणजे हा त्रास आपल्याला रोज जाणवत नाही तर, अचानक शरीराच्या एका विशिष्ट भागात तणाव जाणवतो. हिप बोनचा त्रास सांध्यांमध्ये जास्त जाणवतो. अधिकतर हा त्रास स्नायू आणि हाडांवर जास्त दबाव आल्यामुळे होतो.

ठराविक वेळेनंतर अधिक तास काम करणे,एकाच स्थितीत बराच वेळ राहणे तसेच कॅल्शिअमची कमतरता यामुळे हिप बोनचा हा त्रास होतो. बदलती जीवनशैली हे एक प्रमुख कारण आहे.