अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान

नवी मुंबई: मागील आठवड्यात कोकणात आलेल्या अवकाळी पावसाचा आंबा बागायतदारांना फटका बसून नुकसान झाले आहे. नुकताच आलेला मोहोर आणि छोटी कैरी पावसामुळे गळून पडली. त्यामुळे यंदा आंब्याचे उत्पादन घटणार आहे.

कोकणातील हापूस आंब्याला थंडीतील वातावरण पोषक ठरते. त्यामुळे या दिवसांत आंब्याचा मोहोर चांगला बहरून फळधारणा चांगली होते. साधारण डिसेंबर, जानेवारीत हा मोहोर फुललेला असतो. मार्चपासून आंबे तयार होण्यास सुरुवात होते. मात्र मागील आठवड्यात सोमवारी अचानक आलेल्या पावसाने आंबा बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळवले आहे.

हवामानातील बदलामुळे आंबा बागायतदार दरवर्षी संकटात सापडत आहे. यंदा जानेवारी महिन्यातच आलेल्या पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा झाडांवरील मोहोर आणि छोटी कैरी गळून पडल्याने बागायतदार कोलमडला आहे. नुकतीच फवारणी केलेल्या कलमांचेही नुकसान झाले असून आता पुन्हा फवारणी करावी लागणार आहे. अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलाचा कोकणातील आंब्यावर विपरित परिणाम होत आहे.त्यामुळे आंब्याचे उत्पादन घटणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली.