तलावाला रात्री फेरफटका मारणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
ठाणे : ठाणेकरांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या मासुंदा तलावाच्या भोवती रात्री ११ नंतर अक्षरशः गर्दुल्ल्यांचा विळखा पडलेला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तलावाला उशिरा फेरफटका मारणाऱ्या ठाणेकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नागरिकांना स्वच्छ आणि चांगल्या वातावरणात फिरता यावे यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून मासुंदा तलावाचे अनेकवेळा संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे. मात्र आता याच तलावाला गर्दुल्ल्यांचा विळखा पडला असल्याने नागरिकांना या ठिकाणी फिरणेही कठीण झाले आहे.
शहराचे केंद्रबिंदू असलेला मासुंदा तलाव, घोडागाडी आणि नौकाविहारसाठी प्रसिद्ध आहे. ठाणे महापालिका प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या सुशोभिकरणामुळे मासुंदा तलावाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. तलावाभोवती करण्यात आलेली विद्युत रोषणाई नागरिकांचे लक्ष वेधत असून या ठिकाणी विरंगुळ्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढली आहे. तलावाभोवती पर्यटकांना आनंद घेता यावा यासाठी लहान मुलांच्या करमणुकीकरिता कार्टून्सच्या वेशभूषा परिधान करुन तसेच गोल्डन मॅनच्या वेशभुषेत काही कलाकार मंडळी तलावाभोवती फिरताना दिसतात. ठाणेकरांची संध्याकाळ मंत्रमुग्ध व्हावी यासाठी शहरातील काही ज्येष्ठ मंडळी एकत्र येत गाण्यांची मैफल रंगवत आहेत. या ठिकाणी ठाणेकर सकाळ-संध्याकाळच्या वेळी फेरफटका मारण्यासाठी येत असतात. शनिवार आणि रविवार या ठिकाणी मोठी गर्दी होते. अनेकजण आपल्या कुटूंबासह तर तरुण मंडळी मोठ्या संख्येने येत असतात.
संध्याकाळचे तलावाचे चित्र रात्री ११ नंतर मात्र भीतीदायक होत असून तलावाच्या भोवती अक्षरशः गर्दुल्ल्यांचा वावर असल्याचे समोर आले आहे. तलावाच्या चारही बाजूने रात्री हे गर्दुल्ले झोपलेले असतात. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोणता गर्दुल्ला कधी अंगावर धावून येईल याचा नेम नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या गर्दुल्ल्यांचा बंदोबस्त करून मासुंदा तलावाची सुटका करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
खा. नरेश म्हस्के यांनी केले ट्वीट
नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी ट्विट केले आहे. ठाण्याचे हृदय म्हणून ओळखला जाणारा मासुंदा तलाव आज गर्दुल्ल्यांनी वेढलेला दिसतो आहे. महापालिका आयुक्तांनी या विषयात लक्ष घालून ठाण्याच्या सौंदर्यात बाधा आणणाऱ्या या समस्येचे निराकरण करावे. अन्यथा, तलावपाळीला भेट देऊन निसर्ग सान्निध्याचा आनंद घेणाऱ्या नागरिकांना या आनंदाला मुकावे लागेल असे ट्विट खा. म्हस्के यांनी केले आहे.
हे अड्डे कधी बंद होणार?
मासुंदा तलावाभोवती रात्री वावरणारे गर्दुल्ले ही अशिक्षित, असंस्कृत आणि गुन्हेगारी वृत्तीची मंडळी आहेत. ठाण्यातील कोठारी कंपाऊंडमधील ग्लिटसारखी बेकायदा हुक्का पार्लर मात्र सुशिक्षित आणि संस्कारी कुटुंबातील तरुण पिढीला उद्ध्वस्त करू पाहत आहेत. या बेकायदेशीर हुक्का पार्लरवर देखील कारवाई करण्यास पोलीस आणि पालिका प्रशासनाला भाग पाडावे. हिरानंदानी, राबोडी आदी ठिकाणी असलेल्या गर्दुल्ल्यांचे अड्डे देखील उद्ध्वस्त करावेत अशी मागणी दक्ष ठाणेकर करत आहेत.