खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केले समाधान
ठाणे: गेल्या आठ महिन्यांपासून तयार झालेले दिघागाव रेल्वे स्थानक व्हीआयपींच्या प्रतिक्षेत रखडले होते. हे स्थानक सुरू व्हावे यासाठी खासदार राजन विचारे यांनी पाठपुरावा केला होता, त्याला यश आल्याची माहिती त्यांनी दिली.
रेल्वेमंत्री, रेल्वे राज्यमंत्री आणि रेल्वे प्रशासन यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. खासदार राजन विचारे यांनी या दिघा गाव रेल्वे स्थानकात स्वाक्षरी मोहीम घेऊन दहा हजार लोकांच्या सह्या घेतलेली कागदपत्रे आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच रेल्वेमंत्री व रेल्वे राज्यमंत्री यांना दिले.
नुकताच युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही या स्थानकाला भेट दिली. तयार झालेले दिघागाव रेल्वे स्थानक का सुरू करीत नाही असा जाब सरकारला विचारल्यानंतर सरकार खडबडून जागे झाले असे खा. विचारे यांनी सांगितले. दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्याचे आता निश्चित झाले असून रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांचे पत्र प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले.
नवी मुंबई शहरात नोकरीनिमित्त कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथील नागरिक येत असतात. या रेल्वे प्रवाशांना नवी मुंबईत येण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात येऊन हार्बर मार्गावरील वाशी लोकल पकडावी लागते, त्यामुळे या प्रवाशांचा अतिरिक्त वेळ आणि पैसा खर्च होतो. या प्रवाशांना थेट नवी मुंबईमध्ये प्रवेश मिळण्यासाठी हा ऐरोली कळवा एलिव्हेटेड प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा वाढणारा अतिरिक्त भार ही कमी होणार आहे, त्यामुळे ठाण्यातील प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी माहिती श्री.विचारे यांनी दिली.