नवी मुंबई: एपीएमसी बाजारात पालेभाज्यांची आवक वाढल्याने पालेभाज्यांचे दर घसरले आहेत. काही दिवसांपूर्वी पालेभाज्या प्रती जुडी १०-१५ रुपयांनी उपलब्ध होत्या. आता मात्र प्रति जुडी ५ ते ७ रुपयांवर विक्री होत असून किरकोळ बाजारात १५-३० रुपयांनी विक्री होत आहे. दुसरीकडे फळभाज्यांचे दर अजूनही चढेच आहेत.
डिसेंबर महिन्यात पालेभाज्यांचा स्वस्ताईचा हंगाम सुरु होतो. या हंगामात पालेभाज्या स्वस्त होतात, विशेषत: कोथिंबीर, मेथी जास्त प्रमाणात आणि कमी दरात उपलब्ध होते. एपीएमसी बाजारात सध्या कोथिंबीर २०१७०० क्विंटल तर मेथी ८४८०० क्विंटल, पालक २०५९००क्विंटल दाखल होत आहे. त्यामुळे दरात घसरण झाली असून चढ्या दराने उपलब्ध असलेली कोथिंबीर, मेथी आता प्रतिजुडी आता ५-७ रुपयांवर उपलब्ध आहे. किरकोळ बाजारात ही १५-२० रुपयांनी विक्री होत आहे.
परतीच्या पावसामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनाला फटका बसला होता. त्यामुळे बाजारात आवक कमी होती. आवक कमी झाल्याने बाजारात मेथीचे आणि कोथिंबिरीचे दर गगनाला भिडले होते. मात्र आता आवक वाढली असून मागणी कमी असल्याने दर घसरले आहेत.